Lok Sabha Election 2024 : आरक्षण, नोकरीसह शेतकऱ्यांना MSP ची गॅरेंटी; काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

Congress Manifesto For Lok Sabha Election 2024 :

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ‘न्यायपत्र’ म्हणजेच जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध केला गेला. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून जनतेला 25 गॅरेंटी म्हणजे आश्वासने दिली आहेत. लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यास ही सर्व आश्वासने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही काँग्रेसने दिली आहे.

काँग्रेसचा जाहीरनामा हा गरीबांना समर्पित आहे. काँग्रेसचा हा जाहीरनामा 5 न्याय जे युवा न्याय गॅरेंटी, नारी न्याय गॅरेंटी, किसान न्याय गॅरेंटी, श्रमिक न्याय गॅरेंटी, हिस्सेदारी न्याय गॅरेंटीसह 25 गॅरेंटींवर आधारित आहे, अशी माहिती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली.

जातनिहाय जनगणना, जुनी पेन्शन योजना, गरीब कुटुंबातील महिलांना वार्षिक 1 लाख रुपये मदत देणार, 2025 मध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार MSP ची कायदेशी हमी, कामगारांना 25 लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच, मोफत उपचार, हॉस्पिटल, डॉक्टर, औषधे, चाचण्या आणि शस्त्रक्रिया करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. काम, पैसा आणि कल्याण या तीन शब्दांवर काँग्रेसचा जाहीरनामा आधारित आहे. कामचा अर्थ म्हणजे रोजगार किंवा नोकरी उपलब्ध करून देणे, असा असल्याचे मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे पुढील प्रमाणे…

तरुणांसाठी आश्वासने..

> प्रत्येक शिक्षित तरुणाला 1 लाख रुपयांच्या अप्रेंटिसशिपचा हक्क देणार
> 30 लाख सरकारी नोकऱ्या देणार
> अग्निवीर योजना बंद करून जुनी भरती योजना सुरू करणार
> पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठी कायदा करणार
> सरकारी कंपन्या (पीएसयू) आणि सरकारी नोकऱ्यांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी करणार

महिलांसाठी दिलेली आश्वासने…

> गरीब कुटुंबातील महिलांना वार्षिक 1 लाखाची मदत
> महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षण देण्यासाठी राज्यघटनेत सुधारणा करणार
> आशा, माध्यान्ह भोजन योजना, अंगणवाडी सेविकांचे वेतन वाढवणार
> प्रत्येक ग्रामचंयातीत एक अधिकार सहेली
> नोकरी करणाऱ्या महिलांसाठी दुप्पट वसतिगृह
> 450 रुपयांना गॅस सिलिंडर देणार
> बस प्रवासात सवलत देणार

शेतकऱ्यांसाठी आश्वासने…

> स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशींनुसार MSP म्हणजे किमान हमी भावासाठी कायदा करणार
> कर्जमाफी योजना लागू करण्यासाठी आयोग स्थापन करणार
> पिकांचे नुकसान झाल्या 30 दिवसांत बँक खात्यात मदत निधी जमा करणार
> शेतकऱ्यांच्या सल्ल्यानुसार नवीन आयात-निर्यात धोरण आखणार
> शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीवरील GST हटवणार

मजूर, कामगारांना आश्वासने…

> रोजंदारी मजुरांना 400 रुपये, मनरेगामध्येही ही रोजंदारी लागू करणार
> कामगारांना 25 लाखांचे आरोग्य कवच, मोफत उपचार, हॉस्पिटल्स, डॉक्टर, औषधे, चाचण्या आणि शस्त्रक्रिया
> शहरांसाठीही मनरेगा सारखी नवी योजना आणणार
> असंघटित क्षेत्रातील मजुरांसाठी जीवन आणि अपघात विमा देणार
> मुख्य सरकारी कार्यालयांमधील कंत्राटी मजुरी बंद करणार

मागास समाजांसाठी आश्वासने…

> समानतेसाठी प्रत्येक व्यक्ती आणि समाजाची गणना करणार
> राज्यघटनेत सुधारणा करून आरक्षणाची 50 टक्के असलेली मर्यादा हटवून ती वाढवणार
> SC/ST/OBC यांना पूर्ण हक्क देणार
> जेवढी SC/ST ची लोकसंख्या तेवढा बजेट
> वन अधिकार कायद्या अंतर्गत येणाऱ्या जमिनींचा निर्णय 1 वर्षात घेणार

ही निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी- राहुल गांधी

ही निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आहे. आज देशाचे संविधान धोक्यात आहे. ‘इंडिया’ आघाडी हे संविधान वाचवण्यासाठी लढत आहे. ही लढाई मूलभूत हक्कांसाठी आहे. भाजप लोकशाही आणि संविधानावर सतत हल्ला करत आहे, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर भाजपवर केला.