Lok Sabha Election 2024 : मोदींनी विरोधकांवर तीर सोडला, लागला मात्र अशोक चव्हाणांना; कार्यकर्तेही अवघडले

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नांदेडमध्ये सभा घेतली. या सभेमध्ये मोदींनी विरोधकांवर टीकेचे तीर सोडले, मात्र हे तीर नुकतेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांना लागले. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यासह कार्यकर्तेही गपगार झाल्याचे पहायला मिळाले.

नरसी येथील सभेत गृहमंत्री अमित शहा यांनी ‘नांदेड का मौसम बिघडा है’, असे वक्तव्य करुन भाजप उमेदवाराची चांगलीच अडचण केली होती. त्यानंतर शनिवारी कोठा मैदानात पंतप्रधान मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये मोदींनी केलेल्या विधानाची सर्वत्र चर्चा आहे. ‘जे लोक निवडून येऊ शकत नाही ते मागच्या दाराने राज्यसभेत खासदार बनतात’, असे विधान मोदींनी अशोक चव्हाण यांच्याकडे कटाक्ष टाकून केले. मोदींच्या या वक्तव्यामुळे चव्हाणांसह समोर बसलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनाही अवघडल्यासारखे झाले.

काय म्हणाले मोदी?

काही लोकं निवडून येण्याची क्षमता नसल्याने मागच्या दरवाजाने राज्यसभेवर खासदार म्हणून जात आहेत, याला काय म्हणावे, असे विधान मोदींनी केले. या विधानानंतर नांदेडच्या सभेत प्रचंड शांतता निर्माण झाली. दरम्यान, मोदी यांच्या बाजूलाच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना खुर्ची देण्यात आली होती. गेल्या निवडणुकीमध्ये चव्हाण यांचा पराभव झाला होता. त्यानंतर यंदा त्यांनी भाजपची कास धरली आणि त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. मात्र मोदींच्या विधानानंतर चव्हाणांचे तोंड पडले आणि समर्थकांमध्ये निरव शांतता पसरली.

आदर्श घोटाळ्याचा आरोप

दरम्यान, 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडमधील सभेत अशोक चव्हाण यांच्यावर हल्ला चढवला होता. आदर्श घोटाळ्यात अडकलेल्या चव्हाणांवर कारवाईचे आश्वासन मोदींनी दिले होते. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्स (ट्विटर) वर शेअर केला आहे.