मोदींचा ‘विजय’रथ रोखण्यासाठी काँग्रेसची खेळी, भाजपमधून आलेल्या ‘अजय’ला वाराणसीतून उमेदवारी

देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असून प्रमुख पक्षांकडून उमेदवारीच्या याद्याही जाहीर होत आहेत. एकूण सात टप्प्यात होत असलेल्या या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली चौथी यादी शनिवारी रात्री प्रसिद्ध केली. चौथ्या यादीमध्ये काँग्रेसने 45 उमेदवारांची घोषणा केली असून यातील चार उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. यापूर्वी काँग्रेस महाराष्ट्रातील सात उमेदवारांची घोषणा केली होती. आता नव्या यादीमध्ये काँग्रेसने मध्य प्रदेशातील 12, उत्तर प्रदेशातील 9, तमिळनाडूतील 7, महाराष्ट्रातील 4, राजस्थानमधील 3, मणिपूर, जम्मू-कश्मीर आणि उत्तराखंडमधील प्रत्येकी 2, पश्चिम बंगाल, आसाम, छत्तीसगड, मिझोराम, पश्चिम बंगाल आणि अंदमान-निकोबारमधील प्रत्येकी एका उमेदवाराची घोषणा केली. याच यादीमध्ये वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान मोदींना कोणाचे आव्हान असणार आहे हे देखील स्पष्ट झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदारसंघातून उभे राहणार आहेत. या मतदारसंघातून काँग्रेस कोणता उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष होते. चौथ्या यादीतून हे नाव समोर आले आहे. काँग्रेसने मोदींविरोधात अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. शनिवारी रात्री काँग्रेसने जाहीर केलेल्या 45 उमेदवारांच्या यादीमध्ये अजय राय यांचे नाव होते आणि त्यांना वाराणसीतून तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध अजय राय असा सामना रंगणार आहे.

कोण आहेत अजय राय?

अजय राय हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून प्रदेशाध्यक्षही आहेत. संघाच्या तालमीमध्ये ते तयार झाले असून भाजपमध्ये सक्रियही होते. भाजपने त्यांना तीन वेळा कोलासना मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट दिले होते आणि तिन्ही वेळेस त्यांनी विजय मिळवला होता. मात्र लोकसभेचे तिकीट न मिळाल्याने ते नाराज झाले आणि 2009मध्ये त्यांनी समाजवादी पार्टी मध्ये प्रवेश केला. समाजवादी पार्टीने त्यांना मुरली मनोहर जोशी यांच्याविरोधात वाराणसी मतदारसंघातून उतरवले होते, मात्र ते पराभूत झाले.

Lok Sabha Election 2024 – भाजपने आणखी एक मित्र गमवला! आता ‘या’ पक्षासोबतही फाटलं; स्वबळावर निवडणुका लढण्याची वेळ

पाच वेळा आमदार राहिलेल्या अजय राय यांनी 2012मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2014 आणि 20189मध्येही त्यांनी वाराणसी मतदारसंघातून मोदींविरोधात उतरवले होते. मात्र दोन्ही वेळेस ते पराभूत झाले. 2023मध्ये त्यांना काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष केले. आता पुन्हा एकदा ते मोदींविरोधात शड्डू ठोकून उभे राहिले आहेत. वाराणसीमध्ये सातव्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान होणार आहे.