लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि भाजपचा अतिउत्साही भोपळा जनतेने फोडला. महाविकास आघाडीने भाजपचे मनसुबे उधळून लावत 30 जागा जिंकल्या. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे.
रोहित पवार कराडच्या प्रितिसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपवर टीका केली आहे. “तत्व ही चव्हाण साहेबांसाठी महत्त्वाची होतीच. संतांनी सुद्धा तत्त्वांचं महत्त्व आपल्या सर्वांना सांगितलं, महापुरुषांनी सांगितलं. महात्मा गांधींनी सुद्धा सांगितलं आणि तसंच चव्हाणसाहेबांनी त्या गोष्टी जपल्या. आज पवारसाहेब सुद्धा त्या गोष्टी जपत आहेत. पुढे आम्हीही सर्व कार्यकर्ते विचार आणि तत्त्व जपूनच कार्य करणार आहोत. विचार सहज मिळत नसतात त्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि कालचं जे यश आहे ते त्याच विचारांचं यश आहे. जे लोकांनी जपलं आणि पाठिंबा दिला”, असं रोहित पवार म्हणाले.
“भाजपने कुटुंब फोडलं, पार्टी फोडली आणि त्यांना असं वाटलं दिल्ली स्टाईलमध्ये काही गोष्टी महाराष्ट्रात चालतील. पण त्यांना महाराष्ट्र कळलाच नाही, असं आपल्याला कुठे तरी बोलाव लागेल. लोकांना कुटुंब फोडणं, विचारांना सोडून दुसरीकडे फक्त सत्तेत जाण्यासाठी जाणं, पार्टी फोडणं हे आवडत नाही. महाराष्ट्रातल्या लोकांना तर आजिबात आवडत नाही. लोकांनी काल खऱ्या अर्थाने ते दाखवून दिलं. खरी राष्ट्रवादी कोणाची हे सुद्धा लोकांनी दाखवून दिलं”, भाजपला लोकांनी त्यांची जागा दाखवली असं म्हणत रोहित पवार यांनी भाजपला टोला लगावला.
“अजित पवार एक स्वत: मोठे नेते आहेत. त्यांना जो कुठचा निर्णय घ्यायचा तो त्यांचा असतो. जेव्हा अडचणी असतात तेव्हा इथे येणं फार महत्त्वाच असतं. यश जेव्हा मिळतं तेव्हा सुद्धा इथे येणं तितकच महत्त्वाच आहे. फक्त इथे येऊन फोटो काढणं कुठल्याही नेत्याला योग्य ठरत नसतं. खऱ्या अर्थाने विचार मनामध्ये ठेवून त्यापद्धतीने वागणं हे पण तितकच महत्त्वाचं असतं”, असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
“आम्ही कार्यकर्ते म्हणून पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विचार जपत, संघर्ष करत पुढे चाललो आहोत. लोकांनी जो प्रतिसाद काल लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला दिला, आम्हाला विश्वास आहे की विधानसभेत सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळेल आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही,” अस म्हणत विधानसभेत महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास रोहित पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.