बॅक टू फिफ्टीज… पुन्हा शाळा भरली! लोकमान्य सेवा संघाचा ज्येष्ठांना ‘दिलासा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनच्या काळात ज्येष्ठांना वेगवेगळ्या विषयांत गुंतवून ठेवणाऱया लोकमान्य सेवा संघाच्या ऑनलाइन ‘दिलासा’ कार्यक्रमाचा दुसरा वर्धापनदिन 26 मे रोजी गोखले सभागृहात संपन्न झाला. ऑनलाइन ‘दिलासा’च्या 100 कार्यक्रमांनंतर पहिलाच ऑफलाइन कार्यक्रम सादर झाला. ‘बॅक टू फिफ्टीज’ या नीलम वराडकर यांच्या संकल्पनेतून हा अनोखा कार्यक्रम झाला…ज्येष्ठांची जणू शाळा भरली.

शाळेत रांगोळी आणि सनईवादनाने वातावरण निर्मिती केली. श्रीखंडवडय़ा, चिंचेच्या, बडीशेपच्या गोळ्या, रंगीबेरंगी लिमलेटच्या गोळ्या, सफेद रिबिनी देऊन सभासदांचे स्वागत करण्यात आले. सारेचजण सफेद आणि निळ्या रंगाचा पेहराव करून आले. शाळेचा गणवेश जणू… ‘दिलासा’च्या अध्यक्षा बागेश्री परिख शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून हातात पट्टी घेऊन विद्यार्थ्यांना शाळेच्या वातावरणात घेऊन गेल्या.

पारंपरिक घंटा वाजवून आणि प्रार्थनेने वर्गाची सुरुवात झाली. माहेरच्या नावांनी हजेरी घेऊन बालपणीच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. शारीरिक शिक्षणाच्या पहिल्या तासाला हलक्या व्यायाम प्रकाराबरोबर हस्तमुद्रा घेण्यात येऊन त्यांचे फायदे सांगण्यात आले. दुसरा तास स्वलिखित वाचनाचा होता. 22 सभासदांनी गेल्या दोन वर्षांत आपल्याला आवडलेल्या स्वलिखिताचे वाचन केले. काही कथांनी डोळ्यांत अश्रू तरळले तर काही कथांनी हास्याचे फवारे उडवले. मधल्या सुटीत खाऊचे वाटप करण्यात आले.