दुष्काळाने तलाव सुकला…अन् आढळले लुप्त झालेले गाव….

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी एका गावची जमीन संपादित करून तेथे तलाव बांधण्यात आला. त्यामुळे मोठ्या शहराची पाणीपुरवठ्याची समस्या सुटली. मात्र, वाढती जागतिक तापमानवाढ आणि दुष्काळामुळे तलावातील पाणी सुकले आणि त्या तलावात लुप्त झालेल्या गावाचे दर्शन घडले. हे लुप्त झालेले गाव पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. तलावातील या गावात अनेकजण सेल्फीही घेत आहेत. ही घटना ब्रिटनच्या डर्बीशायर तलावाबाबत घडली आहे.

मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करण्याच्या हेतून 1940 च्या दशकात डर्बीशायरजवळील डेरवेंट गाव स्थलांतरीत करून त्या ठिकाणी तलाव बांधण्यात आला. या तलावातून डर्बी, शेफील्ड, नॉटिंघम आणि लिसेस्टरसारख्या मोठ्या शहरांना पाणीपुरवठा होऊ लागला. या शहरांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटला आणि हे गाव विस्मृतीत गेले.

वाढते तापमानवाढ आणि दुष्काळामुळे यावर्षी तलावातील जलसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला. पाणीसाठा कमी झाल्याने गावातील काही भाग दिसू लागले. तसेच पाणीसाठ्यात घट झाल्याने तलावात लुप्त झालेल्या गावाचे दर्शन घडत आहे. तलावात लुप्त झालेले गाव बघण्यासाठी अनेकांची गर्दी होत आहे.

ब्रिटनमध्ये उष्णतेचा कहर सुरू आहे. उष्णतेच्या लाटेने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. त्यामुळे लेडीबोवर जलायशयातील पाणीही सुकेल आणि तिथेही एका लुप्त झालेले गाव दिसेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

असे होते डेरवेंट गाव
या गावात कॉटेज असलेली वस्ती होती. या गावातून डेरवेंट नदी वाहत होती. तिला दगडांचे बंधारे बांधण्यात आले होते. एक लहान मात्र संघटीत गाव होते. या गावात काही घरे, दोन शाळा आणि एक चर्च होते. ते 1757 मध्ये बनवण्यात आले होते. या ठिकाणी तलाव बांधण्यात आल्यावरही चर्च पाडण्यात नव्हते. त्यावेळी तलावात पाणी साचल्यावरही पाण्यातून चर्चचे शिखर दिसत होते. मात्र, काही काळानंतर अनेकजण पाण्यात पोहून चर्चच्या शिखरापर्यंत जात होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव चर्च पाडण्यात आले.

आता तलावाचे पाणी सुकल्यानंतर गावाचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यावरून गाव आणि गावाच्या राहणीमानाची कल्पना येते. 1829 मध्ये गावात 100 जण राहत होते. तसेच दरवर्षी जुलै महिन्यात या गावात मेळावा भरत होता, अशी माहितीही मिळाली आहे.