18 वर्षीय लोरेन्झोकडून वावरिंकाला पराभवाचा धक्का; इटालियन ओपन टेनिस

169

इटलीच्या 18 वर्षीय लोरेन्झो मुसेती याने मंगळवारी तीन वेळच्या ग्रॅण्ड स्लॅम चॅम्पियन स्टॅन वावरिंकाला पराभवाचा धक्का दिला. फ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्ड स्लॅमआधी रोम येथे इटालियन ओपन टेनिस स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत लोरेन्झो मुसेती याने पुरुष एकेरीत स्टॅन वावरिंकावर 6-0, 7-6 अशा फरकाने दणदणीत विजय मिळवला आणि पुढे पाऊल टाकले. लोरेन्झो मुसेतीचा जन्म 2002 साली झाला. याच वर्षी स्टॅन वावरिंका याने व्यावसायिक टेनिसमध्ये पाऊल ठेवले. जागतिक रँकिंगमध्ये 249व्या स्थानावर असलेल्या लोरेन्झो मुसेती याने 10व्या सीडेड स्टॅन वावरिंकाविरुद्ध पहिलाच सामना खेळताना दमदार विजय मिळवला. स्टॅन वावरिंकाला या लढतीत सूरच गवसला नाही. सुरुवातीच्या आठ गेममध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला. अखेर एक तास व 24 मिनिटांमध्ये त्याचा खेळ खल्लास झाला.

पुढल्या फेरीसाठी सज्ज

स्टॅन वावरिंकाला टेलिव्हिजनवर खेळताना बघितले होते. त्यामुळे या लढतीत माझ्या समोर खडतर आव्हान असेल हे माहीत होते. या लढतीत मिळवलेल्या विजयाचा आनंद काही औरच आहे. मात्र आता पुढील फेरीत केई निशिकोरीला सामोरे जायचे आहे. या लढतीसाठीही सज्ज व्हायला हवे असे मत लोरेन्झो मुसेती याने यावेळी व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या