कोरोनामुळे घटलेले प्रवासी रेल्वेला मिळेनात! सहा लाख प्रवाशांची घट, महसूलही कमी झाला

देशातून कोरोना महामारी संपून दोन वर्षे उलटली असून सर्वकाही सुरळीत सुरू आहे. पण कोरोनाच्या काळात मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलचे कमी झालेले प्रवासी दोन वर्षांनंतरही रेल्वेला मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे. कोरोनाच्या आधी लोकल प्रवाशांची दैनंदिन संख्या 42 लाखांच्या घरात होती, ती कोरोना काळात कमालीची घटली होती. मात्र कोरोनाचा प्रभाव कमी होत गेल्याने उद्योगधंदे, कार्यालये पूर्ण क्षमतेने कार्यरत झाली असली तरी प्रवाशांची संख्या मात्र 36 लाखांच्या घरात अडखळत असून सहा लाखांची घट झाली आहे.

मध्य रेल्वेकडून उपनगरीय मार्गावर दररोज 1800 हून अधिक लोकल गाडय़ा चालवल्या जातात. त्या माध्यमातून दररोज लाखो लोक प्रवास करतात. मात्र कोरोना महामारीमुळे लोकल प्रवाशांची संख्या कमालीची घटल्याचे रेल्वेच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. सध्या सर्वसामान्य परिस्थिती असतानाही प्रवासी संख्या सहा लाखांनी कमी असल्याने ती कशी वाढेल या विवंचनेत रेल्वे आहे.

– कोरोनाआधी मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांची प्रवासी संख्या सहा लाख होती ती सध्या 4 लाख 90 हजारांच्या जवळपास आहे. दरम्यान, प्रवासी संख्या कमी झाली असली तरी तिकीट दरवाढीमुळे महसुलात वाढ झाल्याचे दिसत आहे.

वर्क फ्रॉम होमचा फटका
कोरोना महामारीनंतर आयटी पंपन्यांनी आपल्या कर्मचाऱयांना वर्क फ्रॉम होमची परवानगी दिली आहे. त्याचा रेल्वेला फटका बसला असून उपनगरीय लोकलची प्रवासी संख्या कमी झाली आहे. तसेच अनेकजण लोकलऐवजी मेट्रो आणि रस्ते मार्गाने प्रवास करणे पसंत करत असून त्याचाही लोकल प्रवाशांच्या संख्येवर परिणाम झाला आहे.