
सामान प्रतिनिधी । ठाणे
कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क परिसरातील एका चायनीज हॉटेलमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये अग्निशमन दलाच्या एका जवानाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जगन आमले असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे, तर संदीप पालवे (वय ३५), असे गंभीर जखमी झालेल्या जवानाचे नाव आहे. मृत्यू झालेले जवान ८ महिन्यांनी सेवानिवृत्त होणार होते.
कल्याणच्या गोल्डन पार्क परिसरात मध्यरात्री १ वाजून १५ मिनिटाने कल्याणच्या आधारवाडी अग्निशमन दलाच्या कार्यलयात एका नागरिकाने कॉल करून माहिती दिली की, गोल्डन पार्कच्या बाजूला असलेल्या एका शटर बंद चायनीज हॉटेलमधून धूर निघत आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन धूर निघत असलेल्या चायनीज दुकानाचे शटर उघडताच चायनीज हॉटेलमधील सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. त्यामध्ये जगन आमले या जवानाचा मृत्यू झाला, तर संदीप पालवे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जगन यांचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, ऐन दिवाळीमध्ये कल्याण पूर्व भागातील चक्की नाका परिसरात असलेल्या एका विहिरीतील मृतदेह काढताना २ अग्निशमन दलाच्या जवानांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. त्यातच आज पुन्हा एका जवानाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी अवस्थेत असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांमध्ये शोककळा पसरली आहे.

































































