उद्भवमध्ये मायबोलींचा जागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म. ल. डहाणूकर महाविद्यालयाचा आंतरमहाविद्यालयीन महोत्सव विलेपार्ले येथील म. ल. डहाणूकर महाविद्यालय मराठी वाङ्मय मंडळाच्या वार्षिक आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे नाव ‘उद्भव’ आहे. यंदा ‘उद्भव’ची संकल्पना ‘मायबोली’ आहे. 27 फेब्रुवारी रोजी असलेल्या मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून 24 फेब्रुवारी रोजी हा महोत्सव होईल.

‘उद्भव’चा अर्थ उदय किंवा मूळ असा आहे. कोकणी, आगरी, वऱहाडी अशा कित्येक मायबोलींचा जागर होणार आहे. ‘उद्भव’मध्ये चार श्रेणींमध्ये स्पर्धा होतील. ललित, प्रायोगिक कला, साहित्यिक आणि अनौपचारिक श्रेणींमध्ये वक्तृत्व, वादविवाद, संपादकीय, चारोळी, मेहंदी, पुणेरी पाटी, पंदील स्पर्धा, टोट बॅग स्पर्धा, गजर हरिनामाचा, लावणी, संस्कृतीच्या पाऊलखुणा, मराठी व्यक्तिमत्त्व स्पर्धा, विचारांचा पुनर्जन्म स्पर्धा, छायाचित्रण स्पर्धा, रील स्पर्धा अशा एकूण 17 स्पर्धा होतील. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी मराठी वाङ्मय मंडळाने प्रत्येक स्पर्धेसाठी एक प्रतिनिधी आणि 50 विद्यार्थी स्वयंसेवक नेमलेले आहेत. माजी विद्यार्थीही सहभागी होणार आहेत. ‘उद्भव’चे पहिले पर्व मागच्या वर्षी मराठी भाषा दिन म्हणजेच 27 फेब्रुवारीला झाले होते. त्यामध्ये सेंट झेवियर्स महाविद्यालयाने बाजी मारली होती. यावेळी 14 महाविद्यालये सहभागी आहेत, असे ‘उद्भव’चा प्रतिनिधी श्रीराज साळुंखे याने सांगितले.

महोत्सवाची अध्यक्षा निधी पंदरे असून उपाध्यक्ष प्रथमेश शिंदे आणि प्रेक्षा घोसाळकर आहे. सध्या महोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.