
भारतीय जनता पक्षाने (भाजप) सोमवारी आगामी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. 39 उमेदवारांच्या यादीत पक्षाने आपले राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना इंदूर-1 जागेवरून उमेदवारी दिली, ज्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
‘पक्षाने मला तिकीट दिले आहे, परंतु प्रामाणिकपणे, मी मनापासून खूश नाही कारण मला 1% देखील ही निवडणूक लढण्याची इच्छा नाही’, असं भाजप नेते कैलाश विजयवर्गीय म्हणाले.
‘एक मानसिकता असते लढण्याची, आपल्या तर जायचं आहे… पण आता मोठे नेता झालो, हात जोडण्यासाठी कुठे जाणार.. भाषण द्यायचं आणि निघून जायचं.. असं मी आता ठरवलं आहे..’, असं ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ‘आम्ही या निवडणुकीदरम्यान दररोज आठ जाहीर सभा आखल्या होत्या, त्यात पाच हेलिकॉप्टरमधून, तीन कारमधून. पण आपल्याला वाटतं तसं होत नाही, त्यामुळे मी निवडणूक लढवावी अशी देवाची इच्छा होती. निवडणूक लढवायची आणि पुन्हा जनतेमध्ये जायचं’.
‘मला तिकीट मिळालं आहे आणि मी दावेदार आहे यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही’, असंही ते पुढे म्हणाले.
‘मी निवडणूक लढवू इच्छित नाही असे सांगितलं असलं तरी, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला काल काही निर्देश दिले. मी गोंधळात पडलो आणि घोषणा झाल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो. मला निवडणुकीच्या राजकारणात भाग घेण्याची संधी मिळाली. मी पक्षाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन’, असं भाजप नेत्यानं यापूर्वी सांगितलं होतं.
भाजपच्या दुसऱ्या यादीत तीन केंद्रीय मंत्री आहेत – केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर, अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री (MoS) प्रल्हाद सिंग पटेल आणि ग्रामीण विकास आणि स्टील राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते.
नरेंद्रसिंग तोमर दिमनी मतदारसंघातून, तर प्रल्हादसिंग पटेल आणि फग्गनसिंग कुलस्ते हे अनुक्रमे नरसिंगपूर आणि निवासमधून लढणार आहेत.
मध्य प्रदेशात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत.

























































