
मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर शहरामध्ये मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. बस आणि ऑटो रिक्षाच्या जोरदार धडकेत 13 जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 12 महिलांचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी शहरातील जुनी छावणी परिसरामध्ये हा भीषण अपघात झाला. सकाळी अंगणवाडी केंद्राचा अल्पोपाहार तयार करून काही महिला अपघातग्रस्त रिक्षातून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की वेगाने टक्कर देणाऱ्या बसने रिक्षाचा अक्षरशः चुराडा केला. अपघातात रिक्षाचालकासह 8 महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.



























































