
मध्य प्रदेशात एक संतापजनक घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशातील कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी रेल्वेतून बाळासोबत प्रवास करणाऱ्या महिलेसोबत छेडछाड केली आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी दोन्ही आमदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.सागर स्टेशनजवळ ही घटना घडली आहे.
मध्यप्रदेशातील दोन्ही आमदारांची ओळख पटली असून सिद्दार्थ कुशवाह (सटना) आणि सुनील सराफ (कोतमा) अशी त्यांची नावे आहेत. दोघांविरोधात रेल्वे पोलिसांनी 354 कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
हे दोन्ही आमदार गुरुवारी रेवांचल एक्स्प्रेसच्या एसी डब्यातून प्रवास करत होते. काटनी येथून त्यांनी ट्रेन पकडली त्यावेळी ते मद्यधुंद अवस्थेत होते. त्यावेळी तिथे एका बाळासोबत प्रवास करणाऱ्या महिलेसोबत ते छेडछाड करु लागले. पीडित महिलेने त्याबाबत आपल्या नवऱ्याला फोन करुन सांगितले. तिच्या नवऱ्याने तत्काळ ट्विट करत रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे पोलिसांना टॅग करून ही माहिती दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दोन्ही आमदारांवर गुन्हा दाखल केला.

























































