महाबळेश्वरात आणखी एक टेम्पो 200 फूट खोल दरीत कोसळला, तीन युवक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाबळेश्वर तालुक्यातील विकासकामांसाठी अकोला, बुलडाणा येथून येणाऱया मजुरांचा टेम्पो दरीत कोसळण्याच्या घटनेला 48 तास उलटत नाही, तोच आणखी एक टेम्पो 200 फूट खोल दरीत कोसळला आहे. ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली, तरी तीन युवक गंभीर जखमी झाले आहेत. महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावरील चिखली शेड परिसरात रविवारी (दि. 15) रात्री ही घटना घडली आहे.

श्रीकांत गणपत बावळेकर (वय 24), विजय बजरंग मोरे (वय 25) व सुरज यशवंत घाडगे ( वय 26) अशी जखमींची नावे आहेत.

महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड येथून इलेक्ट्रिक साहित्य घेऊन रविवारी सायंकाळी टेम्पो तापोळ्याच्या दिशेने निघाला होता. चिखली शेड परिसरातील वळणावर टेम्पोचे ब्रेक निकामी झाल्याने हा टेम्पो थेट 200 फूट दरीत कोसळला. अपघातानंतर हा टेम्पो झाडामध्ये अडकला. या टेम्पोमध्ये तीन युवक होते. रात्रीच्या अंधारात यातील एक युवक झाड, फांद्यांच्या आधाराने मुख्य रस्त्यावर आला आणि रस्त्याने जाणाऱयांना त्याने अपघाताची माहिती दिली.

या अपघाताची माहिती मिळताच, शिवसेनेचे संतोष जाधव व सहकारी तसेच सह्याद्री ट्रेकर्सचे किरण चव्हाण, संजय पार्टे व दीपक जाधव यांनी अंधारात बॅटरीच्या मदतीने तत्काळ जखमींना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघातात एका युवकाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे, तर एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. एकाच्या डोक्याला व हाताला मार लागला आहे. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर दोघांना अधिक उपचारासाठी दोघांना वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी या टेम्पोमधील फ्रिज, टीव्ही आदी इलेक्ट्रीक वस्तू बाहेर काढण्याचे काम सुरू होते. 108 रुग्णवाहिकेला या अपघाताची माहिती देण्यात आली होती. यानंतर रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचली. मात्र, या रुग्णवाहिकेत असलेल्या डॉक्टरांनी जखमींची तपासणी व उपचारदेखील तातडीने केले नसल्याचे घटनास्थळावरील नागरिकांनी सांगितले आहे.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी तालुक्यातील विकासकामांसाठी अकोला व बुलडाणा येथून आलेल्या 40 मजुरांचा टेम्पो 300 फूट खोल दरीत कोसळला होता. यात 11 लहान मुलांसह अनेकजण जखमी झाले होते. महाबळेश्वर तालुक्यातील दोन दिवसांत घडलेली अपघाताची ही दुसरी घटना आहे.