
राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघांची शिखर संस्था असलेली महानंद डेअरी आता केवळ नावापुरतीच शिखर संस्था राहिली आहे. एकेकाळी दररोज 8 लाख लिटर दुधाची विक्री केली जात होती, ती आता 40 हजार लिटरपर्यंत खाली आली आहे. सभासद संघांकडून दूध मिळणे बंद झाले आहे. तसेच सरकारनेही डेअरीकडे दर्लक्ष केले आहे. त्यामुळेच डेअरीवर ही वेळ आली आहे.
महानंद डेअरीचे राज्यभरात 85 जिल्हा व तालुका दूध संघ आहेत. डेअरीच्या उपविधीनुसार सभासद संघांनी आपल्या एकूण संकलनाच्या किमान पाच टक्के दूध महानंदला पुरवणे बंधनकारक आहे. मात्र सध्या तुटवडा असल्याने खुल्या बाजारात प्रतिलिटर दुधाचा खरेदी दर 42 रुपयांच्या घरात आहे, तर महानंद डेअरी 40 रुपये दर देत आहे. तसेच डेअरीचा प्रशासकाने खरेदी दरात वाढ करण्यास नकार दिला आहे. त्यामुळेच दुधाअभावी डेअरीची दुधाची विक्री आतापर्यंतच्या सर्वात निच्चांकी स्तरावर गेली आहे.
दोन दिवसांपासून 55 टक्के कट
राज्य सरकारने महिनाभरापूर्वी डेअरीचे संचालक मंडळ बरखास्त केले तेव्हा डेअरीची दुधाची दैनंदिन विक्री दीड लाख लिटर होती, ती आता 40 हजार लिटरपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून दूध वितरणामध्ये 55 टक्क्यांचा कट लागत आहे. तसेच टेट्रापॅकिंग, सहउत्पादनांसाठी तर दूधच उपलब्ध होत नाही.


























































