
मंगळवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड केली. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी फोनवर संवाद साधला.
बेळगाव शहरासह जिल्ह्यामध्ये मंगळवारी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. विशेषत: निपाणी जवळील कोगनोळी टोलनाका आणि हिरे बागेवाडी जवळील हिरेबागडी टोलनाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र असे असताना देखील कर्नाटक कन्नड रक्षण वेदिकेचे अध्यक्ष नारायण गौडा आपल्या शेकडो समर्थकासह बेळगावमध्ये आंदोलन करण्यासाठी दाखल झाले. त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणालाही न जुमानता त्यांनी महाराष्ट्रातून आलेल्या गाड्यांवर जोरदार हल्ला चढवला. काही गाड्यांच्या काचा फोडल्या, मार्ग काही काळापासून रोखून धरला. कर्नाटकच्या या मुजोरीवर महाराष्ट्र सरकार नेळभट भूमिका घेत असल्याचा आरोप विरोधक करत आहे.
View this post on Instagram
एकीकडे विरोधक सीमावादावरून आक्रमक झालेला असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद झाला. यावेळी फडणवीस यांनी बेळगावनजीक हिरेबागवाडी येथे झालेल्या घटनांबद्दल तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली.
‘तिथून येऊ नकाचा खलिता आला आणि…’, संजय राऊत यांचा मिंधे सरकारवर हल्लाबोल
फडणवीस यांनी फोनवरून नाराजी व्यक्त केल्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्रातून येणार्या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी फडणवीस यांच्याशी फोनवर झालेल्या संवादादरम्यान दिले.


























































