महाराष्ट्र फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर; रंगनाथ पठारे यांना जीवनगौरव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाऊंडशेन या संस्थेचे पुरस्कार आज जाहीर झाले. साहित्याचा जीवनगौरव ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे यांना घोषित झाला आहे. कथा आणि कादंबरी लेखनासाठी वाङ्मय प्रकार पुरस्कार राजन गवस यांना आणि अनुवाद व लेखनाचा विशेष पुरस्कार सोनाली नवांगुळ यांना मिळाला आहे. जीवनगौरव पुरस्कार दोन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह तर वाङ्मय प्रकार व विशेष पुरस्कार प्रत्येकी एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह या स्वरूपांत आहे.

साहित्यातील सहा, सामाजिक कार्याचे चार आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृति पुरस्कार असे एकूण 11 पुरस्कार आज घोषित झाले. पुरस्कारांची घोषणा विनोद शिरसाठ, मुपुंद टाकसाळे आणि डॉ. मनीषा गुप्ते यांनी केली. अनिल साबळे यांना ‘पिवळा पिवळा पाचोळा’ या कथासंग्रहासाठी ललित ग्रंथ पुरस्कार, शरद बाविस्कर यांना ‘भुरा’ या आत्मकथनासाठी ग्रंथ पुरस्कार देण्यात येणार आहे. रा. शं. दातार नाटय़लेखन पुरस्कार संदेश कुलकर्णी यांच्या ‘पुनश्च हनिमून’ या नाटकासाठी दिला जाणार आहे. दोन्ही ग्रंथ पुरस्कार आणि नाटय़लेखन पुरस्कार प्रत्येकी पन्नास हजार रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपात दिले जाणार आहेत. येत्या 28 जानेवारी रोजी पुण्यामध्ये मासूम संस्था आणि साधना ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यामाने टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित करण्यात येणार आहे.

सामाजिक कार्याचा गौरव
सामाजिक कार्य पुरस्कारांमध्ये संभाजीनगरचे शांताराम पंदेरे यांना दलित आणि भूमिहीनांच्या हक्कासाठी केलेल्या कार्यासाठी आणि करमाळा येथील प्रमोद झिंजाडे यांना विधवा प्रथा निर्मूलनाच्या कार्यासाठी विशेष कार्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. प्रत्येकी एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. कुमारीबाई जमकातन (गडचिरोली) यांना संघर्ष पुरस्कार आणि नंदिनी जाधव (पुणे) यांना प्रबोधन पुरस्कार दिला जाणार आहे. हे दोन्ही कार्यकर्ता पुरस्कार प्रत्येकी पन्नास हजार रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपातील आहेत. याशिवाय डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार यावर्षी ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क (नवी दिल्ली) या संस्थेला दिला जाणार आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.