
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेलगतची महाराष्ट्रातील काही गावे कर्नाटकात यावीत असे विधान करून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रात मोठा असंतोष निर्माण केला आहे. त्यांच्या या विधानामुळे निर्माण झालेल्या वादामुळे सर्वसामान्यांचे हाल होऊ लागले आहे. या वादामुळे दगडफेक होऊ नये, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्र-कर्नाटक सार्वजनिक बस सेवेची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या मुळे कामासाठी महाराष्ट्रात किंवा कर्नाटकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत.
शिवरायांचा अपमान विसरावा म्हणून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रावर हल्ला!
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच मोठे कारस्थान आणि षड्यंत्र रचले गेले आहे. त्यानुसार कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पुढे केले गेले आहे आणि ते महाराष्ट्रावर हल्ला करत जत, सोलापूर, अक्कलकोटवर दावा सांगत आहेत. भाजपने लिहून दिलेल्या स्क्रीप्टनुसार सगळं चाललंय, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपची पोलखोल केली.
भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे. भाजपच्या एका राज्याचा मुख्यमंत्री भाजपच्या दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर अशाप्रकारे कधीच टीका करत नाही. त्यामुळेच कर्नाटकच्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांविषयी अशा प्रकारे बोलणे हे ठरलेले स्क्रिप्ट आहे. शिवरायांच्या अपमानाचा विषय मागे पडावा म्हणून बोम्मईना पुढे केले गेले आहे, हे स्पष्टच आहे, असा थेट आरोप राऊत यांनी केला. राज्यपालांनी जेव्हा मुंबई-ठाण्यातील मराठी माणसांचा अपमान केला तेव्हा लक्ष विचलित करण्यासाठी मला अटक केली गेली. त्यांचे स्क्रिप्ट तयारच असते. आताही त्यांनी तसेच केले. मात्र, भाजपने अशी कितीही कारस्थाने केली तरी महाराष्ट्राची जनता सजग आहे. शिवप्रेमी जनता शिवरायांचा अपमान सहन करणार नाही. याविरोधात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुंकलेच आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सगळ्यात मोठी लढाई लढण्यास आम्ही तयार आहोत, असा इशाराही राऊत यांनी दिला. खोके सरकार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर महाराष्ट्राचा विश्वास नाही. यांना खोके दिले की हे गप्प बसतील आणि महाराष्ट्राला विसरतील पण शिवसेना महाराष्ट्राला विसरणार नाही, असेही राऊत यांनी ठणकावून सांगितले.
शरद पवारांची घेतली भेट
संजय राऊत यांनी शुक्रवारी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्रातून हटवले जावे, ही शिवसेनेची मागणी आहे. राज्यपालांना हटवले नाही तर प्रसंगी महाराष्ट्र बंद करू, असा इशारा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. या मुद्दय़ांवर शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्याचे यावेळी राऊत यांनी नमूद केले. शिवसेनेच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचाही पाठिंबा असल्याचे राऊत यांनी सांगितले.
























































