अवघ्या दोन मिनिटांत शिवराजने केला महेंद्रचा खेळ खल्लास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्या लढतीसाठी 80 हजार कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती ती लढत अवघ्या दोन मिनिटांतच आटोपली. एकाच तालमीतील दोन पैलवानांमध्ये झालेला हा संघर्ष रंगलाच नाही. शिवराज राक्षेने भावासम असलेल्या महेंद्र गायकवाडला चितपट करीत प्रतिष्ठेच्या ‘महाराष्ट्र केसरी’वर आपले नाव कोरले.

65 व्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबावर नाव कोरताच नांदेडच्या कुस्तीप्रेमींपेक्षा अधिक जल्लोष पुणेकर चाहत्यांनी केला. कारण  शिवराज हा नांदेडचे प्रतिनिधित्व करत असला तरी तो मूळचा पुणे जिह्यातील राजगुरूनगर येथील राक्षेवाडीचा मल्ल  होय. किताबी लढतीनंतर उभय मल्लांनी एकमेकांना आलिंगन देत ‘ही दोस्ती तुटायची नाय’ हे उपस्थित कुस्तीशौकिनांच्या साक्षीने दाखवून दिले. महेंद्र गायकवाडला ‘उपमहाराष्ट्र केसरी’ किताबावर समाधान मानावे लागले.  सायंकाळी बरोबर 7 वाजून 46 च्या ठोक्याला ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाची सलामी झडली.

गादी विभागातील काटक व चपळ शिवराज राक्षे आणि माती विभागातील बलदंड व ताकदवान महेंद्र गायकवाड यांच्यात चौदंडी सुरू झाली. शिवराजने दुहेरी पटात घुसण्याचा केलेला प्रयत्न महेंद्रने धुडकावून लावला. त्यानंतर शिवराज सावध पवित्र्यात आला, मात्र सरपंचांनी त्याला कुस्ती खेळण्याची ताकीद दिली. मग शिवराजने पुन्हा दुहेरी पटात घुसत महेंद्रला खाली खेचले. महेंद्रने शिवराजच्या मगरमिठीतून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र शिवराजने त्याला चीतपट करून दोन मिनिटांत कुस्ती संपवली अन् चांदीची चमचमती गदा उंचावली.

‘महाराष्ट्र केसरीची गदा जिंकणं हे प्रत्येक मल्लाचं स्वप्न असतं. त्यामुळे साहजिक आनंद झालाय. वस्ताद काका पवार यांच्या मार्गदर्शनामुळे माझं ‘महाराष्ट्र केसरी’चं स्वप्न सत्यात उतरलं. आता माझं पुढचं लक्ष्य हे ऑलिम्पिक असेल. गतवेळी खांद्याच्या दुखापतीमुळे ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते, मात्र यावेळी मोठय़ा तयारीने आखाडय़ात उतरल्याचा फायदा झाला.’

  • शिवराज राक्षे  (महाराष्ट्र केसरी विजेता)

कुस्तीपटूंच्या मानधनात वाढ

पुणे : महाराष्ट्रातील कुस्तीगीरांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धेतील कुस्तीपटूंना 6 हजारांऐवजी 20 हजार, हिंद केसरी-महाराष्ट्र केसरी आणि रुस्तम- ए-हिंद विजेत्याला 4 ऐवजी 15 हजार, अर्जुन पुरस्कारार्थीला 6 ऐवजी 20 हजार, तर वयोवृद्ध कुस्तीपटूला अडीच हजारांऐवजी साडेसात हजार रुपये मानधन दिले जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.