मंडपाला हात लावाल तर याद राखा; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण आणखी तापत आहे. या मुद्द्यावर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर ते उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला गेले होते. त्यानंतर आता सरकारने अंतरवाली सराटीतील आंदोलनस्थळाचा मंडप हटवण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती मिळत आहे. याबाबतची माहिती मिळताच मनोज जरांगे उपचार सोडून तातडीने अंतरवाली सराटीकडे निघाल्याची माहिती मिळत आहे.

आंदोलनस्थळाचा मंडप काढण्याबाबतची माहिती मिळताच जरांगे पाटील यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे. मी जेलमध्ये सडायला तयार आहे, पण अंतरवालीतील मंडपातील एक कापडही काढू देणार नाही, असे आव्हानच मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. मंडपाला हात लावाल तर याद राखा. मंडपाच्या एकाही कापडाला हात लावला, त्यावरील शिवरायांच्या मूर्तीला हात लावाल तर महागात पडेल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. त्यामुळे मनोज जरांगे आणि राज्य सरकारमधील संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता आहे.

आंतरवालीकडे निघालेल्या मनोज जरांगे यांची पोलीस अधिकाऱ्यांनी भेट घेत मंडप सध्या तरी हटवण्यात येणार नाही, असे आश्वासन पोलिसांनी जरांगे यांना दिल्याचे समजत आहे. मनोज जरांगे यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश हे विधानसभा अध्यक्षांनी दिले असून त्याचे पालन करू असं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे यांच्या मागून जर कुणी राजकीय डाव साधत असेल तर त्याला उघडं पाडू असा इशारा देवेंद्र फडणीसांनी दिला आहे.