‘भ्रष्ट तितुका मिळवावा, भाजप पक्ष वाढवावा’, असेच त्यांचे धोरण; उद्धव ठाकरे कडाडले

महाविकास आघाडीची मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यात महाविकास आघाडीने जागावाटर जाहीर केले. त्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेवेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जागावाटपाची चर्चा आणि महाविकास आघाडीतील समन्वय यांची माहिती दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. तसेच भाजप म्हणजे भाकड, भेकड, भ्रष्ट जनता पक्ष असल्याचा हल्लाबोल ही त्यांनी केला.

नवे वर्ष आनंदाचे, सुखसमृद्धीचे आणि हुकूमशाही नष्ट कराणारे असो, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशातील जनतेला गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आघाडी किंवा युतीत शक्य असेल तोपर्यंत चर्चा होत असतात. आघाडीतील प्रत्येक घटकाचा तो अधिकार आहे. मात्र, एक क्षण असा येतो की, एकमेकांना समजून घेत जागावाटप जाहीर करत प्रत्यक्ष निवडणुकीसाठी सज्ज व्हावे लागते. आता तो क्षण आला आहे. सर्वांच्या मनातील शंकांना या पत्रकार परिषदेतून उत्तरे मिळाली असतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रत्येक जागेवर लढण्याची इच्छा आणि महत्त्वाकांक्षा पक्षाची असते. मात्र, जिंकण्याचे मोठे उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेवल्यानंतर एका क्षणाला सर्व इच्छा आणि महत्त्वाकांक्षांना आवर घालावा लागतो. आपण कशासाठी, कोणासाठी आणि कोणाविरोधात लढत आहोत, ते लक्षात घेत निर्णय घेऊन मैदानात उतरावे लागते आणि जिंकावे लागते. आता कोणाच्याही मनात काहीही प्रश्न किंवा शंका नाहीत. शिवसेनेने सर्व 21 जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे उमेदवार एक, दोन दिवसात जाहीर करतील, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

विजयासाठी महाविकास आघाडी तयारीला लागली आहे, मात्र आता आम्हाला जास्त मेहनत घेण्याची गरज नाही. आता जनतेनेच ठरवले आहे, अब की बार भाजप तडीपार आणि जनता हे करून दाखवणार आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी जास्तीतजास्त व्यापक करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आघाडीतील इतर घटक पक्षांनी एकही जागा न मागता संविधान रक्षणासाठी सुरू असलेल्या आमच्या लढ्यात ते सहभागी झाले.वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनीही आमच्यासोबत यावे, अशी आमची भूमिका होती. त्यांना काही जागा देऊ केल्या होत्या. मात्र, ते होऊ शकले नाही. तसेच प्रकाशा आंबेडकर आमच्याबाबत काहीही म्हणाले तरी आम्ही त्याला प्रत्युत्तर देणार नाही, अशी भूमिका आपण घेतली होती. त्यांच्याबाबत आजही आम्हाला प्रेम आणि आदर आहे. संविधान रक्षणासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका घ्यावी, असे आम्हाला वाटते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

काल अमावस्या, सूर्यग्रहण आणि मोदी यांची सभा असे विचित्र योग होते. तसेच काल झालेले भाषण हे पंतप्रधान पदावरील व्यक्तीचे नव्हते. शिवसेनाप्रमुख ज्या पक्षाला कमाळाबाई म्हणायचे, त्या भाकड, भेकड, भ्रष्ट जनता पक्षाचे एक नेते नरेंद्र मोदी यांचे भाषण होते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर कोणीही त्या पदावर राहत नाही. हा आता भेकड, भाकड जनता पक्ष आहे. त्यामुळे यापुढे आमच्याकडून टीका झाली तर ती पंतप्रधान या पदावरील व्यक्तीसाठी नसेल, त्या पदाचा आम्ही कधीही अपमान करणार नाही. भ्रष्ट तुतका मिळवावा, भाजप पक्ष वाढवावा, असे त्यांचे धोरण आहे. महाराष्ट्राच्या बाहेरच्या व्यक्तीने येथे येत येथील जनतेला असली शिवसेना नकली शिवसेना याबाबत सांगावे हा कहर झाला, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजप हा खंडीखेर पक्ष आहे. चंदा लो, धंदा दो, असे त्यांचे धोरण आहे. खंडणीखोर पक्षाचे नेते शिवसेनाला नकली सेना म्हणत आहे. त्यांनी इतिहासाचा अभ्यास तपासून बघावा. 2019 मध्ये तत्कालीन त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा मातोश्रीवर आले होते आणि शिवसेनाप्रमुखांच्या फोटोसमोर त्यांनी लोटांगण घेतले होते. त्यावेळीही मीच पक्षप्रमुख होतो आमची हीच शिवसेना होती. याचा त्यांना विसर पडला आहे. मात्र, महाराष्ट्रातील जनता हे विसरलेली नाही. खंडणीखोर पक्षाच्या नेत्याने शिवसेनेबाबत बोलणे योग्य नाही. त्यांना शिवसेनाही गुजरातला पळवायची होती, ती आपण पळवू दिली नाही म्हणून त्यांच्यासोबत असलेल्या चायनीज मालातच त्यांना सुख वाटत आहे. त्यांचे हे सुख त्यांना लखलाभ असो, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

काँग्रेसने देशासाठी चांगला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. इंडिया आघाडी सत्तेत आल्यास त्याची अंमलबाजावणी केली जाईल. तसेच राज्यासाठी वेगळे मुद्दे असल्यास आणि आवश्यकता असल्यास महाविकास आघाडीचा जाहीरनामा आणला जाईल, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.