
187 विद्यार्थ्यांना 100 टक्के
9,382 शाळांचा 100 टक्के निकाल
81,991 विद्यार्थी 90 टक्क्यांच्या पुढे
राज्याच्या दहावीच्या निकालात यंदा गुणांचा पाऊस पडला आहे. या परीक्षेत 95.81 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून राज्याचा एकूण निकाल 1.98 टक्क्यांनी वाढला आहे. परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांची संख्याही यंदा जास्त असून तब्बल 187 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजेच 100 टक्के गुण मिळाले आहेत. निकालात यंदाही लातूर पॅटर्नची चर्चा रंगली. लातूर विभागातील तब्बल 123 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. राज्यात सर्वाधिक निकाल सिंधुदुर्ग जिह्याचा लागला आहे. जिह्यातील तब्बल 99.35 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर सर्वात कमी निकाल वर्धा जिह्याचा 92.02 टक्के आहे.
राज्यातील 15 लाख 49 हजार 326 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 14 लाख 84 हजार 441 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालातही कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.01 टक्के इतका लागला आहे, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 94.73 टक्के इतका आहे. निकालात मुलींचा दबदबा कायम असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा 2.65 टक्क्यांनी अधिक आहे. परीक्षेत 97.21 टक्के मुली, तर 94.56 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांनीही परीक्षेत चांगली कामगिरी केली असून दिव्यांगांचा निकाल 93.25 टक्के इतका लागला आहे. 9078 दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी 8465 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विभागनिहाय निकाल
कोकण 99.01
कोल्हापूर 97.45
पुणे 96.44
मुंबई 95.83
अमरावती 95.58
नाशिक 95.28
लातूर 95.27
छत्रपती संभाजीनगर 95.19
नागपूर 94.73
100 गुण मिळविलेले विद्यार्थी
पुणे 10
नागपूर 1
छत्रपती संभाजीनगर 32
मुंबई 8
कोल्हापूर 3
अमरावती 7
नाशिक 0
लातूर 123
कोकण 3
एकूण 187
0 टक्के निकालाच्या शाळा
पुणे 6
नागपूर 5
छत्रपती संभाजीनगर 5
मुंबई 5
कोल्हापूर 1
अमरावती 7
नाशिक 3
लातूर 6
कोकण 0
एकूण 38
100 टक्के निकालाच्या शाळा
पुणे 1542
नागपूर 1007
छत्रपती संभाजीनगर 840
मुंबई 1533
कोल्हापूर 1270
अमरावती 1063
नाशिक 1006
लातूर 608
कोकण 513
एकूण 9,382
कोकणचा अटकेपार झेंडा
गेल्या कित्येक वर्षांपासून दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये कोकण विभागाने सर्वाधिक निकालाची परंपरा राखली आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिह्यांत साक्षरतेचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. येथील लोकांमध्ये गुणवत्ता असून हीच गुणवत्ता येथील विद्यार्थ्यांमध्येही दिसून येत असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकडे येथील पालकांचा कल आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेत कोकण विभाग सातत्याने आघाडीवर असल्याचे गोसावी यांनी स्पष्ट केले. दरम्यान दहावीच्या परीक्षेत सिंधुदुर्ग जिह्याचा निकाल 99.35 टक्के आणि रत्नागिरी जिह्याचा निकाल 98.25 टक्के इतका लागला आहे.
निकालाची वैशिष्टय़े
एकूण 72 विषयांपैकी 18 विषयांचा 100 टक्के निकाल.
25,327 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी 12,958 विद्यार्थी उत्तीर्ण.
17 नंबरचा अर्ज भरून परीक्षा देणाऱया 25,368 विद्यार्थ्यांचा 80.42 टक्के निकाल.
राज्यातील 30 शाळांचा शून्य टक्के
यंदा 35 टक्के गुण असलेला एकही विद्यार्थी नाही.
एकूण 145 कॉपी प्रकरणे, सर्वाधिक कॉपी छत्रपती संभाजीनगरात 86.
परीक्षेतील गैरप्रकार 299
राज्यातील 17 विद्यार्थ्यांचे निकाल राखीव. मुंबई 14, पुणे, नाशिक, नागपूर प्रत्येकी 1.
100 टक्के गुण मिळालेले गुणवंत
अनन्या कुलकर्णी, सरस्वती सेकेंडरी स्कूल, नौपाडा, ठाणे
अनुष्का काळे, श्रीमती आनंदीबाई केशव जोशी शाळा, ठाणे
आर्या ढवळे, सिस्टर निवेदिता इंग्रजी शाळा, एमआयडीसी, डोंबिवली
खुशी शिंदे, डॉ.एस.राधाकृष्णन विद्यालय, मालाड (पश्चिम)
शर्वी महंते, कार्मेलाईट कॉन्व्हेंट स्कूल, वसई
सृष्टी काळे, एनआरसी कॉलनी स्कूल, कल्याण
प्रथमेश दाते, सिस्टर निवेदिता इंग्रजी शाळा, एमआयडीसी, डोंबिवली
पूर्वी शिर्के, कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल बदलापूर
खासगी शिकवणीशिवाय 100 टक्के
मालाड येथील डॉ. एस. राधाकृष्णन विद्यालयाची विद्यार्थिनी खुशी शिंदेला कोणत्याही खासगी शिकवणीशिवाय 100 टक्के गुण मिळाले आहेत. तिला दहावीच्या परीक्षेत 500 पैकी 485 गुण आहेत. शास्त्राrय नृत्य (कथ्थक) प्रकारात तिला 15 सवलतीचे गुण मिळाले आहेत. तिने गंधर्व संगीत महाविद्यालयातून कथ्थक नृत्य मध्यमा पूर्ण ही परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. खुशीची आई रेवा आणि वडील राजेंद्र शिंदे हे मालाड येथील संस्कारधाम महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. खुशीने शाळेतील शिक्षकांसोबतच आईवडिलांच्या मार्गदर्शनाखाली दहावीचा अभ्यास केला. खुशीला पुढे सायन्स शाखेत प्रवेश घ्यायचा असून संशोधनात करीअर करण्याचे तिचे स्वप्न आहे. नृत्याबरोबरच तिला इंटरमिजीएट चित्रकला परीक्षेतही प्रथम श्रेणी मिळाली आहे.
कोकण पुन्हा अव्वल
गेल्या कित्येक वर्षांपासून दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये कोकण विभागाने सर्वाधिक निकालाची परंपरा राखली आहे.
क्लासशिवाय 100 टक्के
मालाड येथील डॉ.एस.राधाकृष्णन विद्यालयाची विद्यार्थिनी खुशी शिंदेला खासगी शिकवणीशिवाय 100 टक्के गुण मिळाले आहेत.






























































