पुलवामा हल्ला गडबड घोटाळा, ‘शर्म करो मोदी, शर्म करो’ काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुलवामा घटनेत मोदी सरकारने राजकीय फायद्यासाठी सुरक्षा त्रुटींकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप जम्मू–कश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न उपस्थित झालेला असताना पंतप्रधान मोदी गप्प आहेत. पुलवामा हल्ला गडबड घोटाळ्याचा जाब विचारण्यासाठी प्रदेश कॉँग्रेसच्या वतीने राज्यभरात ‘शर्म करो मोदी, शर्म करो’ आंदोलन छेडण्यात आले. पंतप्रधानांनी मलिकांच्या आरोपांवर खुलासा न केल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

पुलवामा स्फोट प्रकरणी सत्यपाल मलिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलासा करावा या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धुळे सह राज्यातील सर्व जिल्ह्यात करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, मोदींचे मौन जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत आहे म्हणून देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने, 40 जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून भाजपा व मोदींना जाब विचारत आहे.

पुलवामा स्फोटात सीआरपीएफचे 40 जवान शहिद झाले पण या प्रकरणाचा तपास अजून झालेला नाही. या स्फोटासाठी 300 किलो आरडीएक्स वापरण्यात आले त्याचाही तपास झालेला नाही. पंतप्रधान मोदी यांनी या घटनेचे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भांडवल केले. या घटनेत सरकारची चूक आहे असे त्यावेळचे राज्यपाल सत्यपाल मलिक सांगत असताना त्यांना गप्प राहण्यास का सांगितले? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे मोदींना द्यावी लागणार आहेत पण हे हुकूमशाही सरकार उत्तर देण्याचे टाळत आहेत, असे पटोले म्हणाले.

मोदी–अदानी संबंध काय?

उद्योगपती अदानीने जनतेच्या घामाचा पैसा लुटला त्याचा हिशोबही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावा लागणार आहे. 20 हजार कोटी रुपये कुठून आले व मोदी-अदानी संबंध काय? याचेही उत्तर मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष हा लढा थांबवणार नाही, असे नाना पटोले यांनी सांगितले.