केंद्र राज्यांची थकबाकी नव्हे, भीक घालते! ममतादीदींचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्राकडे असणाऱया थकबाकीच्या मुद्दय़ांवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील सत्ताधाऱयांना चांगलेच खडेबोल सुनावले. जनहिताच्या योजनांसाठी पैसे दिले जात नाहीत. आर्थिक वर्ष 3 महिन्यांनी संपेल, अशावेळी आता राज्यांना पैसे दिले जात आहेत. केंद्र सरकार राज्याची थकबाकी नव्हे, तर ही भीक घालतेय, असा संताप ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला.

जी-20 बैठकीच्या तयारीसाठी दिल्ली दौऱयावर असलेल्या ममता बॅनर्जी यांनी तृणमूल कॉँग्रेस खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी केंद्राकडे असणाऱया राज्याच्या थकबाकीच्या मुद्याकडे लक्ष वेधले. मी ऐकले आहे की कोणीतरी फोन करून राज्य सरकारला थकबाकीचे पैसे मिळतील असे सांगितले आहे. पण ही केंद्र सरकारची हुशारी आहे. वर्षाच्या शेवटी आम्हाला भीक देत आहे. यापेक्षा अधिक काही सांगता येणार नाही, अशा शब्दात संताप व्यक्त केला.

तुम्हीच विचार करा की, आर्थिक वर्ष 3 महिन्यांनी संपेल. आता केंद्र सरकार पैसे देत आहे. यातून आता काहीही करता येणार नाही. केंद्र सरकार हुशार आहे. ते म्हणतील, आम्ही पैसे पाठवले पण तुम्हाला वापरता आले नाहीत. पैसा वेळेत खर्च झाला नाही तर तो आपोआपच परत जाईल. राज्यांचा हक्काचा पैसा देण्यास केंद्र सरकार जाणूबजून टाळाटाळ करत असल्याची टीका ममता बॅनर्जी यांनी केली.

पश्चिम बंगालचे केंद्राकडे 1 लाख कोटी थकीत
केंद्राकडून राज्यासाठी मूलभूत विकासासाठी आवश्यक मदतीची रक्कम मिळत नाही. पश्चिम बंगालची केंद्राकडे 31 जुलैपर्यंत जवळपास 1,00,968.44 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे निवेदन यापूर्वीच ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना दिले आहे. केंद्र सरकारने बंगालच्या 100 दिवसांच्या कामाचे पैसे रोखल्याचा आरोप अलीकडेच ममता यांनी केला होता.