
सामना ऑनलाईन | कोलकाता
देशभरात भाजपचा जोर असला तरी प. बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचा (टीएमसी) बोलबाला आहे. त्यामुळे या राज्यात भाजप-तृणमूल संघर्ष सुरूच राहिला आहे. भाजपने पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ‘जय श्रीराम’ लिहिलेली 10 लाख पोस्टकार्डस् पाठवण्याचा निर्णय सोमवारी घेतल्यानंतर ममतांनी लगेच मंगळवारी ‘जय हिंद, जय बांगला’ असे लिहिलेली 20 लाख पोस्टकार्डस् पाठवण्याचे जाहीर केले. यामुळे ‘पोस्टकार्ड’ वॉर उफाळले आहे.
भाजपला त्यांच्याच हत्याराने पलटवार करण्याण्याच्या हेतूने प. बंगालच्या खाद्यमंत्री ज्योतिप्रिय मलिक यांनी भाजपच्या ‘जय श्रीराम’ला तोडीस तोड ‘जय हिंद, जय बांगला’ने उत्तर देण्याचे ठरवले आहे. टीएमसीने अशी 20 लाख पोस्टकार्डस् पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ‘जय हिंद’वर आमचा मुळीच आक्षेप नाही, असे भाजपचे बंगालमधील सरचिटणीस सयंतन बसू यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, ममताजींना ‘जय श्रीराम’ बोलणे एवढे जड का जात आहे तेच मला कळत नाही. वाजपेयींच्या काळात ममतांनी कधी ‘जय श्रीराम’ला विरोध केला नव्हता, मग आताच त्यांना या शब्दांवर आक्षेप का, असा सवालही बसू यांनी उपस्थित केला.
ममतांनी बदलला डीपी
भाजपने ‘जय श्रीराम’चा नारा दिला आहे. पण प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना या शब्दांचे वावडे आहे. म्हणूनच तर त्यांनी आपला ‘जय हिंद, जय बांगला’ हा नारा असलेला डीपी आता ट्विटर व फेसबुक या आपल्या सोशल मीडिया माध्यमांवर ठेवला आहे. विशेष म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या इतर प्रमुख नेत्यांनीही आपापले डीपी बदलले आहेत.




























































