
एटीएममध्ये मदतीचा बहाणा करत वृद्धाच्या एटीएम कार्डची अदलाबदली करून बँक खात्यातून पैसे काढणाऱयाला साकीनाका पोलिसांनी अटक केली. वरिंदर बिल बहादूर कौर असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी पाच एटीएम कार्ड, दागिने आणि मोटरसायकल जप्त केली आहे.
साकीनाका येथे राहणारे एक ज्येष्ठ नागरिक एटीएममध्ये गेले होते. तेथे वरिंदर याने ज्येष्ठ नागरिकाला मदतीचा बहाणा केला. पैसे काढत असतानाच त्याने वृद्धाचा एटीएमचा पासवर्ड पाहिला. त्यानंतर कार्ड खराब झाले आहे असे भासवत कार्डची अदलाबदली केली. वृद्ध घरी गेल्यानंतर वरिंदरने त्यांच्या खात्यातून 35 हजार आणि ज्वेलर्सच्या दुकानातून 75 हजारांची खरेदी केली. बँक खात्यातून पैसे गेल्याचे लक्षात येताच वृद्धाने साकीनाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी याने अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक बळवंत देशमुख यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक दिनकर राऊत, सहाय्यक निरीक्षक अर्जुन कुदळे, भुवड, खैरमोडे, कोकणे, वंगाळे, जाधव आदी पथकाने तपास सुरू केला.
मोटरसायकलच्या नंबरमुळे अडकला पोलिसांच्या जाळ्यात
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी केली. साकीनाका येथील एटीएममध्ये एक जण मास्क आणि हेल्मेट घालून आत गेल्याचे एका फुटेजमध्ये दिसले. मात्र तो कोण हे स्पष्ट होत नव्हते. त्याचदरम्यान एका फुटेजमध्ये पोलिसांना बुलेट मोटरसायकलचा नंबर दिसला. त्यावरून तपासाची चव्रे फिरली. त्या मोटरसायकलच्या नंबरवरून पोलिसांनी वरिंदरची माहिती काढली. तो नाशिकमध्ये असल्याचे समजताच पोलीस तेथे गेले. तेथून पोलिसांनी वरिंदरला अटक केली.
फसवणुकीसाठी यायचा मुंबईत
वरिंदर हा मूळचा पंजाबचा रहिवासी असून तो 2013 पासून नाशिक येथे राहतो. मुंबई नाशिक महामार्गावर त्याचे छोटेसे हॉटेल आहे. 2013 पासून आतापर्यंत त्याच्यावर नाशिक येथे आठ गुन्हे दाखल आहेत. तो फसवणुकीचे गुन्हे करण्यासाठी महिन्यातून एकदा मुंबईत यायचा. गुन्हा केल्यावर तो कपडे बदलत असायचा. जेणेकरून पोलीस आपल्याला पकडणार नाहीत असे त्याला वाटत होते.































































