तरुणाच्या पोटातून काढला 14 सेंमी. लांबीचा ग्लास, डॉक्टरांनी व्यक्त केले आश्चर्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खाण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. काही लोकं पोटदुखीवर घरगुती औषधोपचार करण्याला महत्त्व देतात. त्यानंतर जास्त त्रास झाला तरच डॉक्टरांकडे जातात. अशाच प्रकारे पोटदुखीने हैराण झालेला एक तरुण रुग्णालयात गेला, मात्र तपासणीनंतर डॉक्टरांना आश्चर्याचा धक्काच बसला.

बिहारमधील बेतिया शहरात ही घटना घडली आहे. येथील 22 वर्षाच्या तरुणाला दारूच्या नशेत असताना भयंकर पोटदुखी होऊ लागली आणि मलद्वारावाटे रक्त जाऊ लागले. त्रासाचे गांभीर्य ओळखून त्याने त्वरित पटणा येथील वैद्यकीय रुग्णालयात धाव घेतली. तेव्हा डॉक्टरांनी तपासणीत त्या मुलाच्या पोटात 14 सेंमी (5.5 इंच) लांबीचा ग्लास अडकला होता. त्यामुळे त्याला मलद्वारावाटे रक्त जात असल्याचे निदान डॉक्टरांनी केले.

पोटात अडकलेला ग्लास काढण्यासाठी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करावी लागली. तरुणाच्या पोटाची शस्त्रक्रिया करणारे डॉ. इंद्रशेखर कुमार यांनी सांगितले की, या तरुणाच्या पोटाची शस्त्रक्रिया करण्याकरिता 11 डॉक्टरांचे पथक कार्यरत होते. त्यांनी यशस्वीपणे त्याच्या शरीरातून स्टीलचा ग्लास बाहेर काढला. याकरिता डॉक्टरांना कोलोस्टॉमी ही शस्त्रक्रिया करावी लागली. डॉक्टरांनी जानेवारी महिन्यात तरुणावर ही शस्त्रक्रिया केली.

मुलगा दारुच्या नशेत असताना स्टीलचा ग्लास त्याच्या अंगात घुसला असावा, त्यामुळे त्याला ग्लास पोटात कसा गेला याबाबत काहीच आठवत नाही, अशी माहिती डॉक्टरांनी केला आहे.

मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील एका व्यक्तीला मागील अनेक दिवसांपासून पाठदुखीचा त्रास होत होता. वेदना सहन न झाल्याने ते भिंडच्या जिल्हा रुग्णालयात गेले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला रक्त तपासणी, अल्ट्रासाऊंड आणि एक्स-रे करण्यास सांगितले. वैद्यकीय अहवाल आल्यावर डॉक्टरांनी सांगितले की, त्या व्यक्तीच्या मूत्राशयात एक खिळा अडकला होता, त्यामुळे त्याचा त्रास खूप वाढला होता. हा खिळा जवळपास वर्षभर त्याच्या मूत्राशयात अडकला होता.