एक खून लपवण्यासाठी 9 खून केले, आरोपीला फाशीची शिक्षा

तेलंगाणा राज्यात एका व्यक्तीने अनैतिक संबंधातून महिलेचा खून केला. एक खून लपवण्यासाठी आरोपीने 9 खून केले आहे, इतकेच नाही तर आरोपीने महिलेच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्याचा व्हिडीओही रेकॉर्ड केला आहे. या प्रकरणी कोर्टाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संजय कुमार यादव हा 6 वर्षापूर्वी बिहारहून तेलंगाणा राज्यातील वारंगल जिल्ह्यात कामानिमित्त स्थायिक झाला होता.

संजय वारंगल जिल्ह्यातील एका गोणी बनवण्याच्या कारखान्यात कामाला लागला. कारखान्यात संजयची ओळख मक्सूद आलमशी झाली. मक्सूद आलम आणि त्यांचे कुटुंबीय 20 वर्षापूर्वी पश्चिम बंगालमधून वारंगलमध्ये स्थायिक झाले होते.

मक्सूद आलमची भाची रफीका ही कारखान्यातील कामगारांना जेवणाचे डबे पुरवायची. तेव्हा रफीका आणि संजयची ओळख वाढली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. रफीकाचे लग्न झाले होते आणि तिला एका अल्पवयीन मुलगीही होती.

संजयने रफिकाला लग्नाचे वचन दिले होते. कुटुंबीयांशी ओळख करून देण्यासाठी रफीका आणि संजय पश्चिम बंगालला जात होते. तेव्हा ट्रेनमध्ये संजयने रफीकाला ताक दिले. ताकात संजयने गुंगीचे औषध मिसळले होते. नंतर पश्चिम गोदावरीहून गाडी जात असताना संजयने रफीकाला फेकून दिले.

संजय वारंगलमध्ये परत आला तेव्हा रफीका त्याच्यासोबत नव्हती. तेव्हा मक्सूदने संजयला जाब विचारला. संजयने मक्सूदला उडवा उडवीची उत्तरं दिली.

नंतर 20 मे रोजी कारखान्यातील कामगारांची एक पार्टी होती. त्यात मक्सूद आणि त्याचे कुटुंबीयही सामील झाले होते. या पार्टीत संजयने मक्सूद आणि त्याच्या कुटुंबीयांना खाण्यातून गुंगीचे औषध दिले होते.

मक्सूद आणि त्याचे कुटुंबीय बेशुद्ध झाल्यानंतर संजयने कारखानाच्या विहरीत त्यांना फेकून दिले. त्यात मक्सूद आलम, त्यांची बायको, निशा आलम, मक्सूद आलमची तीन मुले शाहबाझ आलम, सोहेल आलम, मुलगी बुशरा आलम, बुशरा आलमचा तीन वर्षाचा मुलगा बबलू तसेच संजयचे सहकर्मचारी श्रीराम, श्याम चालक शकील यांचा समावेश  होता.

सर्वजणांचे मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवले होते. जेव्हा सर्वजणांना विहरीत टाकण्यात आले तेव्हा सर्वजण जिवंत होते असे अहवालात समोर आले.

इतकेच नाही तर संजयने रफीकाच्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारही केला होता. त्याचा व्हिडीओ संजयच्या मोबाईलमध्ये सापडल्याने ही घटना उघडकीस आली.

या प्रकरणी पोलिसांनी संजय विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संजयला कोर्टात दाखल केले असता कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या