
एका नराधमाने दोन अल्पवयीन मुलींना इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली फेकले. यात दोन्ही मुलींचा मृत्यू झाला. मुली गोंधळ घालत होत्या त्यामुळे त्यांना खाली फेकले, असे आरोपीने सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रशियामध्ये ही घटना घडली आहे.
हॅलोविनच्या दिवशी कायजिल या भागातील एका रहिवासी इमारतीवरुन पडल्यामुळे दोन मुलींचा मृत्यू झाला होता. यातील एका मुलीचे वय नऊ वर्ष, तर दुसरीचे वय 14 वर्ष असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी याच इमारतीमध्ये भाड्याने राहणाऱ्या एका 23 वर्षीय ओचूर सँचॅट (Ochur Sanchat) या व्यक्तीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ओचूर सँचॅट (Ochur Sanchat) याने गुन्हा कबूल केले आहे. शेजारी राहणाऱ्या मुली खूप गोंधळ घालत होत्या, त्यामुळे आरोपीने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. रागाच्या भरात आरोपीने दोन्ही मुलींना इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली फेकले. यातील एका मुलीचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या मुलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ही घटना घडली तेव्हा इमारतीतील रहिवाश्यांनी मुलींच्या किंचाळ्या ऐकल्या होत्या. तसेच इमारतीतील आठव्या मजल्यावरील फ्लॅटच्या खिडक्या तुटलेल्या होत्या. ज्या मुलींना आरोपीने इमारतीवरून खाली फेकले तिची आई एका कॅफेमध्ये नाईट शिफ्टला काम करते. त्यामुळे ही घटना घडली तेव्हा दोन्ही मुलीच घरी होत्या.
दरम्यान, आरोपी सँचॅट याला याआधीही पोलिसांनी अटक केली होती. एका कार चोरीच्या प्रकरणामध्ये तो सापडला होता. या प्रकरणातून दोन महिन्यांपूर्वीच त्याची सुटका झाली होती.

























































