मांढरदेवी देणगी अपहार प्रकरणात दोघे निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मांढरदेवीच्या काळूबाई मंदिरात देणगी पेटीतील रक्कम मोजताना झालेल्या चोरी आणि अपहारप्रकरणी देवस्थान ट्रस्टचे सचिव रामदास खामकर व उपसचिव लक्ष्मण चोपडे यांना निलंबित करण्यात आले आहे. देवीची पंधरा दिवसांवर आलेली यात्रा आणि तिच्या नियोजनासाठी सचिव सागर मोरे व  उपसचिव दादा कळंबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मांढरदेव देवस्थानच्या देणगी पेटीतील दानाची मोजणी करत असताना या कामी नेमण्यात आलेल्या निवृत्त बँक कर्मचाऱयाने तसेच सहसचिव लक्ष्मण चोपडे व एका कर्मचाऱयाने एक लाख 64 हजार रुपयांची रक्कम व सोन्याचे दागिने लांबविले होते.

याप्रकरणी त्यांना अटक करून त्यांच्या घर झडतीमध्ये 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर सचिव रामदास खामकर क शिपाई बळकंत ढेबे यांचे नाव पुढे आल्याने त्यांना अटक करण्यात आली. पोलीस तपास करत असताना त्यांच्याकडेही काही मुद्देमाल आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे.

सोमवारी देवस्थान ट्रस्टच्या झालेल्या बैठकीत घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. या बैठकीत यात्रेच्या अनुषंगाने देवस्थान ट्रस्ट कर्मचारी सागर मोरे यांची सचिव म्हणून, तर दादा कळंबे यांची सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रामदास खामकर आणि लक्ष्मण चोपडे यांना निलंबित करण्यात आले आहे. सध्या खामकर, चोपडे आणि ढेबे हे तीन कर्मचारी पोलीस कोठडीत आहेत. सोमवारी झालेल्या ट्रस्टच्या बैठकीला ट्रस्टचे अध्यक्ष अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश नंदीमठ, शासकीय विश्वस्त प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रणजित भोसले व सर्व  विश्वस्त उपस्थित होते.