
उन्हाळा आणि आंबा यांचे अतूट नाते आहे. वाढत्या पाऱयामुळे नकोसा वाटणारा उन्हाळा आंब्याच्या मोसमामुळे मात्र सर्वांना हवाहवासा वाटतो. उन्हाळ्यात सगळीकडे आंब्याची चर्चा रंगते, तशीच आता ट्विटरवरदेखील रंगली आहे. फळांचा राजा म्हणजे आंबा…पण आंब्याचा राजा कोण? हे ठरवण्याचा विडाच जणू आंबाप्रेमींनी उचलला आहे. mangowars हा हॅशटॅग वापरून आंबाप्रेमींनी आपली मत मांडली.
विविधता हे हिंदुस्थानचे वैशिष्टय़ आहे ते आंब्यांच्या बाबतीतही पाहायला मिळते. महाराष्ट्रातील हापूस हा देशासह जगभरात प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या जातीच्या आंब्यांची लागवड केली जाते. उत्तर प्रदेशात दशेरी, पश्चिम बंगालमध्ये हिमसागर, आंध्र प्रदेशात सफेदा यांच्यासह देशात केसर, चौसा, लंगडा, तोतापुरी, नीलम अशा विविध जातीचे आंबे आढळतात. त्यामुळे जितक्या प्रकारचे आंबे, तितक्या प्रकारचे आंबाप्रेमी आढळणे हे स्वाभाविकच आहे. आंब्यांमध्ये हापूसला सर्वाधिक मान दिला जातो त्यावरून आंबाप्रेमींमध्ये हे युद्ध सुरू झाले.
दशहरी, चौसा, सफेदा, लंगडा असे आंबेदेखील खाऊन पाहावेत असे एकाने ट्विटमध्ये म्हटलं आहे. काहींनी आपापल्या प्रदेशात आढळणाऱया स्थानिक जातीचे आंबे कसे श्रेष्ठ आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. कोण्या एकाने बंगनपल्ली/ बेनिशान जातीचा आंबा एकदा तरी खाऊन पाहण्याचा आग्रह केला आहे.
शेवटी विजय आंबाप्रेमींचा!
प्रत्येकाने आपापली आवड सांगितल्यानंतर काहींनी समानतेची भूमिका मांडली. ‘शेवटी आंबा तो आंबाच. त्याला कोणत्याही जाती किंवा प्रकारामध्ये वाटू नका,’ अशी भावना काही आंबाप्रेमींनी व्यक्त केली. अखेर या ट्विटरवर रंगलेल्या युद्धात शेवटी विजय आंब्याचा नव्हे, तर आंबेप्रेमींचा झाला आहे!

























































