मणिपूर पुन्हा पेटले दोन गटांमध्ये हिंसाचार, अनेक घरे जाळली; गोळीबारात सीआरपीएफचा जवान जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मणिपूरमध्ये सेनापती जिह्यात दोन गटांमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून आला आहे. हिंसाचारादरम्यान झालेल्या गोळीबारात सीआरपीएफचा जवान जखमी झाला असून अनेक घरे पेटविण्यात आली. संतप्त स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी या भागात सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, कांगपोकपी जिह्यात भागात तापहोऊ कुकी गावात सोमवारी पहाटे 2.30 वाजताच्या सुमारास एक घर काही लोकांनी पेटवून दिले. या घटनेला प्रत्युत्तर देताना पहाटे 4 वाजता सेनापती जिह्यातील नागा तापहोऊ या गावातील अनेक घरे सकाळी पेटवून दिली. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये मोठा संघर्ष उफाळून आला. सकाळी 9 वाजताच्या सुमारास दोन्ही गटांमध्ये गोळीबार झाला. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सीआरपीएफचे पथक पाठविण्यात आले होते. मात्र, गोळीबारात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेचा ताफू कुकी व्हिलेज ऑथोरिटीने या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला असून 24 तासांच्या आत लोकांची घरे जाळणाऱयांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

स्थानिकांचा संताप

घरे पेटवण्याच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी सेनापती गेटजवळ निदर्शने केली. जमावाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 2 रोखून धरला. रस्त्यावर लाकडे आणि टायर पेटवून देण्यात आले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सीआरपीएफची अतिरिक्त कुमक पाठविण्यात आली आहे.