
मराठा आरक्षणासाठी माझं काहीही झालं तरी मी उपचार घेणार नाही. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी मला बोलता येईपर्यंतच दोन दिवसांत चर्चेला यावे. त्यानंतर उपयोग नाही, असे सांगत उपोषणादरम्यान माझे हृदय बंद पडल्यास सरकारचे हृदयही बंद पडेल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला. जरांगे यांची प्रकृती आणखी खालावली आहे. ते आज बोलता बोलताच कोसळले.
मराठा आरक्षणासाठी अन्न-पाणी त्यागून बेमुदत उपोषण करणारे जरांगे पाटील यांची प्रकृती आज रविवारी प्रचंड खालावली आहे. पाच दिवसांपासून अन्न-पाण्यालाही शिवले नसल्याने त्यांचा आवाज क्षीण झाला असून, हातही थरथरत आहेत. बोलता बोलता त्यांचा तोल गेला. प्रकृती खालावल्याने आलेल्या डॉक्टरांच्या पथकाला त्यांनी उपचार करण्यास मज्जाव केला. उपोषणस्थळी महिलांनी जरांगे यांची खालावलेली प्रकृती पाहून रडारड सुरू केली होती. महिलांनी उपचार नको, पण पाणी तरी घ्या, अशी आर्त साद घातली. मात्र, त्यांनी ऐकले नाही. आज रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरीरात त्राण नसल्याने थरथरत्या हातात माईक घेत त्यांनी मराठा समाजाला जिथे उपोषण सुरू झाले, तेथील गावकऱयांनी संबंधित पोलीस ठाण्यात अर्ज द्या म्हणजे सरकारला कळेल, असे आवाहन केले.
पाच दिवसांपासून शरीरात पाणी नसल्याने डिहायड्रेशन होणे, रक्तदाब कमी होणे, रक्तातील साखरेची पातळी घसरणे यांसह किडनी, लिव्हर आणि हृदयावरही परिणाम होतो, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे किमान पाणी तरी प्यावे, अशी विनंती मराठाबांधव जरांगे यांना करीत आहेत. मात्र, जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने सर्वांना त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाटू लागली आहे. रक्तदाबाही कमी होत आहे. उपचारापेक्षा मी ज्यासाठी बसलो ते महत्त्वाचे आहे, असे सांगून माझे हृदय बंद पडल्यास सरकारचे हृदयही बंद पडेल, असा इशारा त्यांनी मिंधे सरकारला दिला.
आम्हीही जात बदलू शकत नाही
तुम्ही तुमची जात बदलू शकत नाही, तशी आम्हीही आमची मराठा जात बदलू शकत नाही. बरळल्यासारखं बोलू नका, असा टोला त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला. जात बघितली असती तर मराठय़ांनी तुम्हाला एवढय़ा उंचीवर नेऊन बसवले नसते. बोलताना तुम्ही चुकता म्हणून लोक तुम्हाला टार्गेट करतात. तुम्ही पोलिसांकडूनच बोलता, एकही पोलीस बडतर्फ केला नाही. 40 ते 42 अधिकाऱयांना बडतर्फ करा. लोक तुम्हाला मुंबई, नागपूर तसेच आंतरवाली सराटीत डोक्यावर घेऊन नाचतील. समितीची सर्व बैठक रद्द करा, समितीचे कामकाज बंद करा आणि उद्या विशेष अधिवेशन बोलवा. आरक्षण द्या, मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, असे ते म्हणाले.
मग रट्टा खायला येता का?
मला बोलता येतं तोपर्यंत या, आमच्याशी चर्चा करा. तुम्हाला अडवलं जाणार नाही. तुमचं स्वागत करू. तुम्हाला संरक्षण देऊ, पण आज पिंवा उद्याच या. त्यानंतर येऊन फायदा नाही. माझी बोलती बंद झाली तर कशाला येता, असा सवाल करतानाच रट्टा खायला येता का? आमचं आता रात्रीपासून सुरू झालं आहे. आता तुम्ही बघायचं. खायचं, झोपायचं आणि घरातच हागायचं, असेही ते म्हणाले.
थोडं थांबा
आता फक्त दोनच पर्याय आहेत. एक म्हणजे सरकारने आरक्षण द्यावं, नाही तर मराठय़ांशी शांततेत सामना करावा. दुसरा पर्यायच राहिला नाही. आता हळूहळू देशातील क्षत्रिय मराठा उठणार आहे. हे थोडय़ा दिवसांत कळेल. थोडं थांबा, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी दारे खुली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी चर्चेची दारे खुली आहेत. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी जोपर्यंत मला बोलता येतं, तोपर्यंतच आज पिंवा उद्या या, मी घायाळ झाल्यावर चर्चा करून काय उपयोग. चर्चा करायची असेल तर निर्णय घेऊनच करा. आम्ही खुल्या चर्चेला तयार आहोत. आमच्याकडे पुन्हा यायचे नाही आणि महाराष्ट्रात आमच्या दारात फिरकायचे नाही, असेही ते म्हणाले.
कुटुंबाला समोर आणू नका
उपोषणस्थळी भेटायला आलेल्या आईची भेट नाकारत जरांगे पाटील यांनी आईला भेटण्यास नकार दिला. जरांगे म्हणाले, माझ्या कुटुंबाला समोर आणू नका, प्रत्येकाचं कुटुंबावर प्रेम असतं. माझंही माझ्या कुटुंबावर अतोनात प्रेम आहे, पण आंदोलनात मी फक्त समाजाचा आहे. कुटुंबाचा नाही, यापुढे माझं कुटुंब माझ्यासमोर आणू नका. प्रत्येकाला लेकरं आई-बाप पाहिल्यावर हुंदका भरून येतो आणि माणूस दोन पावलं मागे येत असतो, याचा विचार करा. माझंही माझ्या कुटुंबावर प्रेम आहे. माझ्या समाजावरही आहे, पण मी एकदा आंदोलनाला बसलो तर कुटुंबाला मानत नाही. मी समाजाला मानतो. मी आधी समाजाचं लेकरू आणि नंतर मी माझ्या कुटुंबाचा. माझं कुटुंब कधीही येत नसतं. आता कुटुंब यायला लागलं. कुटुंबाने येऊ नये. मी पहिला समाजाचा आहे. जगलो तर तुमचा मेलो तर समाजाचा. कुटुंबाने यायचं नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हणताच उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
लढताना रडायचं नसतं…
लढाई लढताना मराठय़ाने म्हणजे क्षत्रियाने रडायचं नसतं. घाबरायचं नसतं. उद्या या अटीतटीच्या लढाईत तुमचं पोरगं गेलं तर बिनधास्त कुंकू पुसायचं, रडायचं नाही. तो क्षत्रियांचा धर्म आहे. लढताना मरण आलं तर मागे सरायचं नाही. लढतच राहायचं. त्यामुळेच मी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही. फक्त तुम्ही शांततेत आंदोलन करा. मी आता हटत नाही. काही झालं तरी हटत नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.































































