‘एप्रिल फूल’नव्हे, हे खरे आहे! आजपासून अनेक गोष्टी बदलणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

आर्थिक वर्ष 2018-19चा अखेरचा दिवस रविवारी संपला. म्हणजेच आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. या नव्या आर्थिक वर्षात बरेच काही नवे पाहायला मिळेल, ऐकावे लागेल. वर्षअखेरीस काही गोष्टींकडे लक्ष दिले असेल तर नव्या आर्थिक वर्षात तुम्हाला त्रास होणार नाही.

ट्रायने काही नियमावली आखली आहे. त्याबाबतच्या जाहिराती आपण नियमित टीव्हीवर पाहतच आहोत. आपल्याला आवडतील तीच चॅनेल निवडा आणि त्याच चॅनेल्सचे पैसे द्या, असा हा प्रकार 31 मार्चपर्यंतच होता. ती तारीख उलटून गेली आहे. ही चॅनेल्स निवडली नसतील तर अखेरची संधीही तुम्ही गमावून बसला आहात. आजपासून एक तर तुमची डीटीएच सेवा विस्कळीत होऊ शकते किंवा त्यासाठी जास्त शुल्क भरावे लागेल.

बँकांची कर्जे स्वस्त झाली आहेत. बँक आता एमसीएलआरऐवजी रेपो रेटच्या आधारे कर्जे देतील. याआधी व्याजदर बँका ठरवत होत्या. शोरूममधून विकल्या जाणाऱया मोटारींवर नंबर प्लेट बसविणे आजपासून अनिवार्य झाले आहे. त्यासोबतच प्रत्येक मोटारीच्या विंडस्क्रीनवर त्या त्या मोटारीच्या इंधनाचा प्रकार आजपासून लिहावा लागेल.

ऑटोमोबाईल कंपन्यांना आपल्या 125 सीसीपेक्षा अधिक क्षमता असलेल्या दुचाकी वाहनांना आजपासून ऍण्टी लॉक ब्रेकिंग सिस्टीम देणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे अपघात बऱयाच अंशी टाळता येतील. 1 एप्रिलनंतर नोकरी बदलणार असाल तर नवीन नोकरीतील पीएफ खाते जुन्या खात्याशी आपोआप जोडले जाईल. म्हणजेच पीएफचे पैसे नव्या खात्यात ट्रान्सफर करायच्या प्रक्रियेतून सुटका होईल.