सोलापुरात दोघा आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या दोघा तरुणांची प्रकृती खालावली आहे. प्रशांत देशमुख व प्रकाश डांगे असे प्रकृती खालावलेल्या तरुणांची नावे असून, आरक्षण मिळाल्याशिवाय अन्न घेणार नाही, असा पण केल्याने त्यांचे कुटुंबीय व आंदोलनकर्ते धास्तावलेले आहेत. बीबीदारफळ येथे ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले, तर सोलापूर-बार्शी मार्गावर ‘रास्ता रोको’ करण्यात आला. आंदोलनकर्त्या तरुणावर गुन्हे दाखल करून रात्री-अपरात्री धरपकड सत्र पोलिसांनी सुरू केल्याने फौजदार चावडी पोलीस समोर आंदोलन करण्यात आले.

सोलापुरात गेल्या सात दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर सकल मराठा समाजाच्या वतीने उपोषण सुरू असून, प्रशांत देशमुख व प्रकाश डांगे यांनी अन्नत्याग केला आहे. दुपारी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी विविध समाजांतील व संघटनेतील शेकडो पदाधिकारी व समर्थक जमलेले असताना, अचानकपणे प्रशांत देशमुख व प्रकाश डांगे यांचा रक्तदाब कमी होऊन श्वासोच्छ्श्वास होण्यास त्रास होऊ लागला. यामुळे उपोषणस्थळी एकच खळबळ उडाली. देशमुख व डांगेंचे कुटुंबीय येऊन त्यांची काळजी घेत होते. तब्बल दोन तासांहून अधिक वेळेनंतरही या दोघांना वैद्यकीय उपचार मिळू शकले नाहीत, त्यामुळे देशमुख यांच्या पत्नी टाहो फोडत होत्या. त्यामुळे वातावरण आणखीनच चिघळले होत. देशमुख यांना चार वर्षांचे मुल आहे. देशमुख व डांगे या दोघांची प्रकृती अन्नत्यागामुळे चिंताजनक बनली आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथे मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनी गावातील गांधी तलावामध्ये जलसमाधी आंदोलन केले. गावातील तरुण आणि ग्रामस्थ या तलावात उतरून आंदोलन केले असून, उपोषणही करण्यात येत आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान, सोलापुरात दुपारी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोलापूर लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी चैत्रा पुणे नाका येथून उपोषणस्थळापर्यंत भव्य रॅली काढली. यात महिला व तरुणांची संख्या सर्वाधिक होती. राज्य सरकारच्या विरोधात घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आरक्षण मिळेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना सोलापुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दिला. काँग्रेसच्या वतीने शहा अध्यान, चेतन नरोटे, विनोद भोसले व पदाधिकाऱ्यांनी रॅली काढत आंदोलनस्थळाला भेट दिली व पाठिंबा जाहीर केला.

जुळे सोलापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षण विरोधी वक्तव्य करणारे नारायण राणे, नीलेश राणे, सदावर्ते व अन्य नेत्यांच्या प्रतिमांना जोडे मारत आंदोलन केले. यापुढे आरक्षणविरोधी वक्तव्य खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे.

कासेगावात ट्रक्टर मोर्चा
मराठा आरक्षणासाठी पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे ट्रक्टर मोर्चा काढण्यात आला. कासेगाव येथे ग्रामस्थांकडून साखळी उपोषण सुरू आहे. यातच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाजाकडून गुरुवारी सकाळी शेकडो ट्रक्टरची रॅली काढण्यात आली. कासेगाव येथून ही रॅली पंढरपूर-सांगोला रोडवरील कासेगाव फाटा येथे आली. या ठिकाणी ‘रास्ता रोको’ आंदोलन करीत मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांची धरपकड; फौजदार चावडीसमोर आंदोलन
सोलापुरात सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांना व आंदोलन चिरडण्यासाठी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. गेल्या दोन दिवसांत 50हून अधिक नेत्यांवर गुन्हे दाखल केले असून, रात्री-अपरात्री कार्यकर्त्यांच्या घरी पोलीस जाऊन शोध घेत आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे राम जाधव यांच्या घरी आज सकाळी व पहाटेच्या सुमारास पोलिसांचा फौजफाटा येऊन त्यांना ताब्यात घेऊन गेला होता. ही वार्ता शहरात पसरताच, मराठा कार्यकर्ते फौजदार चावडी पोलीस स्टेशनसमोर जाऊन घोषणाबाजी करत आंदोलन केले. ज्यांच्यावर गुन्हे दाखल होते, त्यांना सायंकाळी न्यायालयाने जामीनही दिले, त्यामुळे आंदोनकर्ते पुन्हा रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे.

अक्कलकोट-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’
शहर व तालुक्यातील समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण व मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आज सकाळी अक्कलकोट-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. सुमारे दीड ते दोन तास अक्कलकोट-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बंद केल्याने 2 ते 3 किलोमीटरपर्यंत दुतर्फा वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी सुरेशचंद्र सूर्यवंशी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, महेश इंगळे, अमोलराजे भोसले, बाबासाहेब निंबाळकर, प्रवीण देशमुख, बाळासाहेब मोरे, संतोष फुटाणे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्यासह शेकडो आंदोलनकर्ते उपस्थित होते.