सकल मराठा समाजाचा 7 नोव्हेंबरला मशाल मोर्चा

मराठा आरक्षणावर आलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजामध्ये मोठय़ा प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्य सरकारकडून मराठा आरक्षण टिकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असतानाच ‘सकल मराठा समाज’ आणि ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीवर येत्या 7 नोव्हेंबर रोजी मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.

याबाबत पत्रकाद्वारे माहिती देताना मराठा क्रांती मोर्चाने म्हटले की, हा रोष विविध आंदोलनांमधून, बैठकांमधून व्यक्त होत आहे. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती योग्य निर्णय घेण्यात अपयशी ठरली आहे. तसेच स्वतः चव्हाण अनेकदा गोंधळलेले दिसले आहेत.

या पार्श्वभूमीवर मागण्या घेऊन थेट मुख्यमंत्र्यांकडेच जाणार असून त्यांच्या निवासस्थानी मशाल मोर्चाचे आयोजन केले असल्याचे मराठा समाजाकडून सांगण्यात आले. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती बरखास्त करुन नवीन समितीची स्थापना व्हावी, यामध्ये विरोधी पक्षाचाही समावेश व्हावा.

सुप्रीम कोर्टाची स्थगिती उठवण्यासाठी घटनापीठाच्या निर्मितीसाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत. मराठा तरुणांच्या नोकऱया, विद्यार्थ्यांचे प्रवेश संरक्षित केले जावेत, अशी मागणी ‘मराठा क्रांती मोर्चा’कडून करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या