मसालेदार…

74

मीना आंबेरकर

रेंगाळलेली दिवाळी…

कालच भाऊबीज झाली… तरी दिवाळी अजूनही रेंगाळतेय… मग ही खाण्याची मौजमजा आपणही लांबवूया…..

कसे काय वाचकांनो, आपली दिवाळी मौजमजेत गेली असणारच याची मला खात्री आहे. मी सुचवलेल्या खाद्यकृती तुम्ही नक्कीच करून बघितल्या असणार. दिवाळीचे मुख्य चार दिवस संपले तरी दिवाळीचा माहौल अजून संपलेला नाही. दिवाळीच्या वातावरणातून बाहेर पडायला अजून वेळ लागणार हे निश्चित. काही कारणांमुळे काहींची लांबलेली भाऊबीज या आठवडय़ाच्या अखेरपर्यंत पार पडणार. दिवाळीत कामाच्या व्यापामुळे अपुरे राहिलेले शॉपिंग अजून पार पडायचे असेल. खाऊन संपलेला दिवाळीचा फराळ अजूनही काहीतरी मस्त खावे याची जिभेला आठवण करून देत असेल. असो, तर मग या वेळीही असाच काहीतरी खमंग, मनपसंत रुचकर खाद्यपदार्थांच्या रेसिपी आपण पाहणार आहोत. जेणेकरून दिवाळीची आणि दिवाळीतील खाद्यकृतींची चव आपल्या जिभेवर रेंगाळत राहील.

samosa-2

सामोसे

साहित्य…1 किलो बटाटे, 200 ग्रॅम मटार, 8 हिरव्या मिरच्या, 10-15 लसूण पाकळय़ा, एक इंच आले वाटून, 1 चहाचा चमचा आमचूर पावडर, 1 चहाचा चमचा धणे-जिरे पावडर, मीठ, साखर चवीनुसार, 2 चहाचे चमचे छोले मसाला, 2 चमचे तेल व फोडणीचे साहित्य, अडीच वाटय़ा मैदा, अर्धी वाटी बारीक रवा, 1 चहाचा चमचा मीठ, 1 चमचा ओवा व चिमूटभर हळद, 6 चमचे कडकडीत तेलाचे मोहन, तळण्याकरिता रिफाईड तेल किंवा डालडा, 1 चमचा मैदा, 1 चमचा पाण्यात कालवून पेस्ट करणे.

कृती…1 किलो बटाटे उकडून सोलून अगदी बारीक चिरावेत. (हाताने कुस्करू नयेत). 200 ग्रॅम मटार वाफवून घ्यावेत. 1 चमचा तेलाची जिरे व थोडी हळद घालून फोडणी करावी. त्यातच वाटलेली मिरची, आले, लसूण घालून थोडे परतावे. मग 1 चमचा आमचूर पावडर, 2 चमचे खोबरे, 2 चमचे छोले मसाला, 1 चमचा धणे-जिरे पावडर घालून थोडे परतावे व लगेच बटाटय़ाच्या फोडी व मटार घालावेत. चवीनुसार मीठ व साखर घालून परतावे. सारण गार करण्यास ठेवावे. अडीच वाटय़ा मैदा, अर्धी वाटी बारीक रवा, 6 चमचा कडकडीत तेलाचे मोहन घालून भिजवावे. अर्ध्या तासाने पीठ मळून घ्यावे.

मग 12-13 सारखे गोळे करावेत. एका गोळय़ाचा पिठीवर गोल पोळी, फुलक्यासारखी लाटावी. सुरीने मधोमध दोन भाग करावेत. अर्ध्या भागाला कडेने भरावे व कापलेल्या भागाकडून गोल भागाकडे पट्टीचा जोडून सामोसा बंद करावा. कडा बोटाने नीट दाबाव्यात. असे सर्व सामोसे भरावेत. वरील प्रमाणात 24-25 सामोसे रंगावर सामोसे वळावेत. चिंचेच्या आंबड-गोड चटणीबरोबर अथवा पुदिन्याच्या चटणी व सॉसबरोबर खायला द्यावेत.

karanji-m

फ्लॉवर-मटारच्या करंज्या

साहित्य…2 वाटय़ा सोललेला मटार, दीड वाटी बारीक चिरलेला फ्लॉवर, 1 मोठा कांदा बारीक चिरून, 4-5 मिरच्या, 7-8 लसूण पाकळय़ा व अर्धा इंच आले वाटून, 1 वाटी खोवलेले खोबरे, 1 मूठ चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा धण्या-जिऱयाची पावडर, अर्ध्या लिंबाचा रस, चवीनुसार मीठ व थोडी साखर, 3 वाटय़ा कणिक मैद्याच्या चाळणीने चालून, 1 चमचा मीठ, पाव वाटी कडकडीत तेलाचे मोहन, तळण्याकरिता तेल.

कृती…कणकेत मीठ व कडकडीत तेलाचे मोहन घालून पुरीपेक्षा घट्ट भिजवावी. मटार वाफवून घ्यावे. 1 चमचा तेलाची फोडणी करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतावे. मग फ्लॉवर घालून परतावे. फ्लॉवर शिजत आला की तापवलेले मटार घालून परतावे. पाणी अजिबात वापरायचे नाही. फ्लॉवर, मटार शिजले की त्यात वाटलेले आले, मिरची, खवलेले खोबरे, कोथिंबीर, धण्या-जिऱयाची पूड, लिंबाचा रस, मीठ व साखर घालून परतून भाजी काढावी. वरील भाजीचे सारण भरून पुरी लाटून करंज्या भरून मंद आचेवर गुलाबी रंगावर करंज्या तळाव्यात. करंज्या आकाराने छोटय़ा कराव्यात व गरमच खायला द्याव्यात.

paneer-kheer-1पनीरची खीर

साहित्य…250 ग्रॅम पनीर, 2 लिटर दूध, 1 चमचा कॉर्नफ्लॉअर, 1 सपाट वाटी साखर, वेलची पूड अथवा केवडा इसेन्स.

कृती…विकतचे पनीर असेल तर ते खात्रीच्या दुकानातून ताजे आणावे. ताजे पनीर पांढरे शुभ्र दिसते. शिळे पनीर पिवळट दिसते. पनीर घरी करायचे असल्यास 1 लिटर दूध उकळी आल्यावर 2 चमचे व्हाईट व्हिनेगर घालून फाडावे. मलमलच्या कपडय़ावर घालून त्यावर वजन ठेवावे. पाणी पुरते निघाले पाहिजे 4-5 तासांत पनीर होते. एक लिटर उत्तम स्निग्धांश असलेल्या दुधाचे पाव किलो पनीर होते. पनीरचे चौकोनी छोटे छोटे तुकडे करावेत. 2 लिटर दूध आटवून 1 चमचा कॉर्नफ्लॉअर लावून निम्मे होईपर्यंत घट्ट आटवावे. साखर घालून एक उकळी आणावी. साखर विरघळली की खाली उतरवून गार करावे. गार झाल्यावर पनीरचे तुकडे केवडा इसेन्स घालून फ्रीजमध्ये गार करून सर्व्ह करावे.

chicken-chilli

चिकन चिली फ्राय

साहित्य…1 छोटे चिकन अंदाजे 500 ते 600 ग्रॅम, 2 कांदे, 4-5 टोमॅटो, 1 इंच आले व 7-8 लसून पाकळय़ा बारीक वाटून, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 3 चमचे रिफाईंड तेल, 7-8 हिरव्या मिरच्या लांब उभे तुकडे करून, थोडी चिरलेली कोथिंबीर.

कृती…चिकन साफ करून त्याचे तुकडे करावेत. त्याला वाटलेले आले, लसून व मीठ लावून प्रेशर कुकरमध्ये घालून उकडून घ्यावे. शिजलेले चिकन हाडापासून वेगळे काढून त्याचे लांबट तुकडे काढून घ्यावेत. हाडाचा भाग टाकून घ्यावा. कांदा बारीक चिरून घ्यावा. टोमॅटो उकडून साल काढून बारीक चिरावेत. आले, मिरचीचे लांबट तुकडे करावेत. कढईत अथवा जाड बुद्यांच्या पातेल्यात तेल गरम करून कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा. त्यावर उरलेले आले, लसूण घालून परतावे. चिरलेल्या मिरच्या व आले घालावे. लाल तिखट व चिरलेला टोमॅटो घालून परतावे. चिकनचे तुकडे व मीठ घालावे. रस जास्त ठेवायचा नसल्याने पाणी घालू नये. आवडीनुसार कोथिंबीर व आल्याचा रस घालून सर्व्ह करावे.

आपली प्रतिक्रिया द्या