बिहार, आसामात जलप्रलय

38

सामना ऑनलाईन, पाटणा/शिलाँग

आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बिहार, आसाममध्ये अक्षरशः जलप्रलय आला आहे. आसामातील 25, तर बिहारमधील 9 जिल्हय़ांना महापुराने वेढले आहे. आतापर्यंत मुसळधार पावसाने 19 जणांचा बळी घेतला आहे. मेघालय, त्रिपुरालाही पावसाचा जबर फटका बसला आहे.

बिहार व आसाममध्ये गेल्या आठवडय़ापासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यातच नेपाळमध्येही पावसाने संततधार लावल्याने बिहारमधील कोसी, चंबळ, घग्गर, गंडक, भागमती, कमला आदी नद्यांनी केव्हाच धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाण्याचा जोर एवढा वाढला असून अनेक नद्यांनी पात्र बदलले आहे. या नद्यांवर बांधण्यात आलेले कैक बंधारे वाहून गेले आहेत. शिवहर, सीतामढी, पूर्व चंपारण्य, मधुबनी, अररिया, किशनगंज आदी नऊ जिल्हे जलमय झाले आहेत. या जिल्हय़ांमधील जवळपास 18 लाख नागरिकांना महापुराचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पूरग्रस्त भागाचा हवाई दौरा केला.

आसामातही पावसाने कहर केला आहे. तब्बल 25 जिल्हय़ांना महापुराचा विळखा पडला आहे. ब्रह्मपुत्रा व जिंजीराम या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे काठावरच्या गावांमध्ये हाहाकार उडाला आहे. मदतकार्यासाठी राज्य सरकारने 62 शिबिरे उघडली असून, 172 ठिकाणी मदत वितरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. महापुराचा सर्वाधिक फटका बारपेटा जिल्हय़ाला बसला आहे. येथे जवळपास पाच लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. ब्रह्मपुत्रा नदी कोपल्यामुळे मेघालयातही महापूर आला आहे. राजधानी शिलाँगमध्ये गुडघ्याएवढे पाणी तुंबले आहे. त्रिपुरा व मिझोरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले.

आपली प्रतिक्रिया द्या