पिंपरी-चिंचवडमध्ये इमारत कोसळली! 12 जण गाडले गेले!! कचऱ्याचा डोंगर खचून भीषण दुर्घटना, साडेपाच तासांनंतर सहा कामगारांची सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या मोशीतील कचरा डेपोतील कचऱ्याचा सहा ते सात मजली उंच डोंगर ‘वेस्ट टू एनर्जी प्रकल्पा’च्या तीन मजली इमारतीवर कोसळला. इमारत कोसळताच चार कामगार तत्काळ बाहेर पडले. तर एका महिलेसह 18 मजूर इमारतीखाली अडकले. लष्कर, अग्निशामक विभाग, एनडीआरएफ, पोलिसांच्या मदतीने तातडीने बचाव कार्य राबविण्यात आले. साडेपाच तासांनंतर एका महिलेसह सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली. रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते.

(पान 1 वरून) सोमनाथ शेळके (40), सचिन रामदास दबडगाव (32), दादासाहेब किसन आडे (46), सुजाता शिंदे (49), रामप्रतापसिंग चौहान (36), रणविर सिंग (60) या सहा जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. तर, विजय सपकाळ, महेश कुंभार, राहुल गायकवाड, सुनील कोरके, नागेश गायकवाड, अक्षय सावंत, शुभम पाटील, महेश, सनी आदी नऊ कामगार इमारतीखाली अडकले आहेत. पिंपरी – चिंचवड महापालिकेचा कचरा डेपो मोशीतील आदर्शनगर येथील 81 एकर जागेत आहे. येथील कचऱ्यापासून वीज निर्मिती करणार ’वेस्ट टू एनर्जी’ हा प्रकल्प राबविला जात आहे. त्याचे काम अॅन्थोनी लारा या ठेकेदार कंपनीला दिले आहे. या कंपनीची तीन मजली प्रशासकीय इमारत कचरा डेपोत कचऱयाच्या डोंगरालगतच धोकादायक पद्धतीने उभारण्यात आली आहे. डोंगराच्या ढिगाऱ्याखाली दोन कामगार दबले गेल्याची भिती व्यक्त केली आहे. या कामगारांना बाहेर काढण्यासाठी तातडीने शोधमोहिम राबवावी, अशी मागणी कामगारांनी केली.

  • या कचऱ्याच्या डोंगरालगतच ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प उभारला आहे. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास सर्व कामगार जेवणासाठी कार्यालयातील उपाहारगृहात आले होते. गेले पाच दिवस सातत्याने पाऊस येत असल्याने या इमारतीवर कचऱयाचा उंच डोंगर पडला. हजारो टन कचरा इमारतीवर आल्याने इमारत क्षणात कोसळली. इमारत कोसळली तेव्हा इमारतीत 22 कामगार होते. इमारत कोसळताच चार जण तत्काळ बाहेर पडले.
  • इमारतीच्या खालील बाजूला असलेल्या नऊ कामगारांशी कोणताही संपर्क होत नाही. कचऱ्याचा मोठा ढीग पडला आहे. कचरा काढण्याचे काम सुरू आहे. कामगार कचऱयाखाली दबल्याची भीती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱयांनी व्यक्त केली. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.