ताप, सर्दी, खोकल्याचे निमित्त; मासवण आश्रमशाळेतील सात वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, 19 विद्यार्थी तापाने फणफणले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पालघरच्या मासवण आश्रमशाळेत एका सात वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. श्रेयस आंबात असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. ताप, सर्दी, खोकल्यामुळे श्रेयसची अचानक प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच त्याला मृत्यूने गाठले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे याच आश्रमशाळेतील 19 विद्यार्थी तापाने फणफणले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

श्रेयस शनिवारपर्यंत सुस्थितीत असल्याचे आश्रमशाळेतील शिक्षकांनी सांगितले. मात्र रविवारी सकाळी अचानक त्याला धाप लागण्यास सुरुवात झाली. त्याला तातडीने मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने प्राणवायूच्या सहाय्याने १०२ रुग्णवाहिकेतून मनोर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात येत होते. मात्र रुग्णालय गाठण्यापूर्वीच रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवली आहे. १५ दिवसांपूर्वी मासवण परिसरातील एका बालकाचाही अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला होता.

रक्ताचे नमुने पुण्याला पाठवले

सात वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूचे निश्चित कारण शोधण्यासाठी आरोग्य यंत्रणा तपास करीत असून अहवालाची प्रतीक्षा आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तापाची लक्षणे असलेल्या सर्व १९ विद्यार्थ्यांना मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने अधिक तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. संभाव्य साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनाही सुरू करण्यात आल्याची माहिती पालघर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश धुंपलवार यांनी दिली.