
हिंदूंना पूजनीय असणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक सोमनाथ मंदिराविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मौलवीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोमनाथ मंदिराच्या विश्वस्त मंडळानेच ही तक्रार दाखल केल्याची माहिती मिळत आहे.
या मौलवीचं नाव साजिद रशिदी असं असून तो ऑल इंडिया इमाम असोसिएशन या संघटनेचा अध्यक्ष आहे. जानेवारी महिन्यात एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना रशिदीने सोमनाथ मंदिराविषयी गरळ ओकली होती. तो म्हणाला होता की, मेहमूद गझनीने सोमनाथ मंदिराची तोडफोड केली नव्हती, तर तिथे सुरू असलेल्या अनेक अनैतिक गोष्टींना बंद करवलं होतं. गझनीला कळलं होतं की, मंदिरात श्रद्धा आणि हिंदू देवतांच्या नावाखाली अनैतिक गोष्टी होत आहेत. त्याची खात्री केल्यानंतरच त्याने मंदिरावर हल्ला केला होता, असं संतापजनक आणि आक्षेपार्ह विधान रशिदी याने केलं.
या प्रकरणी सोमनाथ ट्रस्टने प्रभास पाटण येथे रशिदी विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 153अ आणि 295अ अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. या विश्वस्त मंडळाचे संचालक व्ही. चावडा यांनी रशिदीच्या व्हिडीओचा उल्लेख केला असून हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचं म्हणत त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवल्याचं म्हटलं आहे.
हिंदू मंदिरांबाबत गरळ ओकण्याची रशिदी याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्याने अयोध्येच्या राम मंदिरावरून अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं. तमाम हिंदू संघटनांनी त्याला त्यावेळी विरोध केला होता.

























































