
काशिराम गायकवाड । कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरूवारीही पावसाचा जोर कामय होता. गेले तीन – चार दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने महावितरणचे तीनतेरा वाजले आहेत. ठिकठिकाणी वीज पोल व वाहिन्या तुटून वीज पुरवठा खंडीत झाल्याने जिल्ह्यातील अनेक गावे अंधारात राहत आहेत. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने वीज ग्राहक संतप्त होत आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अतिवृष्टीमुळे पडझडीच्या घटना घडून नुकसान होत असतानाच महावितरणालाही मोठा फटका बसला आहे. वादळी – वा-यामुळे जिल्हाभरात अनेक ठिकाणी वीज पोल मोडून वीज वाहीन्या तुटून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे अनेक गावे दोन दोन दिवस अंधारात राहत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने ग्राहकवर्ग संतप्त होत आहे.
शहरासह ग्रामीण भागही दोन दोन दिवस अंधारात राहत असल्याने ग्राहक वीज वितरण कार्यालयावर धडक देऊन अधिका-यांना जाब विचारण्याचे प्रकार होत आहेत. कुडाळ शहरासह माणगांव, पावशी व अन्य ग्रामीण भागात वीज सेवा पावसात विस्कळीत होत असून ग्राहकांना अंधारात राहावे लागत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने ग्राहकवर्ग आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
दरम्यान कुडाळसह जिल्हाभरात गुरूवारीही जोरदार पाऊस बरसला. सकाळच्या सत्रात पावसाने थोडीफार विश्रांती घेतल्याने कुडाळ तालुक्यातील पूरस्थिती काहीशी ओसरली होती.मात्र दुपारनंतर पुन्हा पावसाने जोर धरला होता. बळीराजा मात्र या पावसाने सुखावला आहे. सध्या कोकणात भातलावणीची कामे जोरात सुरू आहेत.
































































