
खंडणी न देणाऱ्यांचे अंगावरील कपडे उतरवून त्यांना लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करणाऱ्या यमेश दरेकर उर्फ दादा व त्याच्या साथीदारांवर समता नगर पोलिसांनी ‘मोक्का’ची कारवाई केली आहे.
यमेश दरेकर उर्फ दादा या गुंडाची व त्याचे साथीदार रोहित सिंग (३३) व सागर राठोड (२२) यांची समता नगर, पोयसर परिसरात प्रचंड दहशत आहे. नियमितपणे हप्ता न देणाऱ्यांना रस्त्यात अडवून त्यांचे अंगावरील कपडे उतरवायचे व सर्वांसमोर लोखंडी रॉड, लाकडी स्टम्प व लाथाबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण करायची, अशी कार्यपद्धती असलेल्या यमेश दरेकर व त्याच्या साथीदारांवर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशी मीना, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, साहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे या अधिकाऱ्यांनी नुकतीच मोक्काची कारवाई केली. यमेश दरेकरविरुद्ध गंभीर स्वरूपाचे ३७ गुन्हे, तर रोहित सिंगवर १३ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. सागर राठोड याच्यावर २ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
संघटित गुंड टोळीचा म्होरक्या यमेश दरेकर उर्फ दादा हा फरार आहे, तर रोहित व सागर हे दोघे जेलमध्ये आहेत. यमेश दरेकर याचा शोध घेण्यासाठी उपायुक्त गजानन राजमाने यांचे पथक कसोशीने प्रयत्न करत आहे. पोलीस चकमकीत ठार मारतील या भीतीने यमेश दरेकर याने मुंबई सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली.



























































