
गगनाला भिडलेल्या इंधनाच्या दरांचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीला मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) मंजुरी दिली आहे. त्यानुसार मुंबई शहरासह संपूर्ण महानगरात 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ लागू होणार आहे. रिक्षाचे किमान भाडे 26 रुपयांऐवजी 27 रुपये, तर टॅक्सीचे किमान भाडे 31 रुपयांऐवजी 33 रुपये आकारण्यात येणार आहे.
इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली आहे. त्यानुसार परिवहन आयुक्त कार्यालयाने पाठवलेल्या प्रस्तावावर परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात आला. अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. सुधारित भाडे पहिल्या 1.5 किलोमीटरच्या अंतरासाठी लागू असेल. भाडेवाढीनंतर ऑटो रिक्षाचे किमान भाडे 1 रुपयाने, तर टॅक्सी किंवा ‘काळी-पिवळी’चे किमान भाडे 2 रुपयांनी वाढणार आहे. इंधनाचे वाढते दर तसेच वाढलेला परिचालन खर्च (ऑपरेटिंग कॉस्ट) यामुळे रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ करणे आवश्यक झाले होते, असे परिवहन अधिकाऱयांनी सांगितले.
संपूर्ण महानगर क्षेत्रासाठी नवीन दर
भाडेवाढीबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाने पाठवलेला प्रस्ताव एमएमआरटीएच्या बैठकीत मंजूर झाला. त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरांसह संपूर्ण महानगर क्षेत्रातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई, विरार, पालघर परिसरात सुधारित दर 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.


























































