
सामना प्रतिनीधी, मुंबई
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई व मुंबईबाहेर एमडी या ड्रग्जचा होलसेलमध्ये सप्लाय करणारे दोघे मुख्य सप्लायर क्राइम ब्रँच युनीट-९च्या हाती लागले आहेत. दोघेही पहिल्यांदाच पकडले गेले असून त्यांच्याकडून एकूण १० किलो वजनाचा व एक कोटी ४५ लाख किमतीचा एमडी साठा पोलिसांनी जप्त केला आहे. डोंगरीत राहणारा एक इसम दक्षिण मुंबईत एमडीचा सप्लाय करतो. गेल्या अनेक दिवसांपासून ड्रग्ज सप्लायचे त्याचे काम सुरू असून त्याने आतापर्यंत जवळपास ५० किलो एमडी मुंबईत पेडलरर्सना सप्लाय केल्याची खबर युनीट-९चे एपीआय इरफान शेख यांना मिळाली. मग प्रभारी पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शेख यांनी शिताफीने एमडी हवी असल्याचे नाटक करून त्या सप्लायरला वांद्र्यात एमडी घेऊन येण्यास सांगितले. तो सप्लायर तयार झाल्यानंतर १३ जुलै रोजी नर्गिस दत्त नगर परिसरात देसाई, पोलीस निरीक्षक आशा कोरके, अरुण सावंत, एपीआय शेख, शरद दराडे, उपनिरीक्षक वाल्मीक कोरे, हरीश बनसोडे आदींच्या पथकाने सापळा लावला.
डोंगरीत राहणारा सलीम खान १०५५ ग्रॅम एमडीचा साठा देण्यासाठी तेथे येताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. चौकशीत त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे मग त्याच्या घरातून आणखी ६९०५ ग्रॅम एमडी साठा हस्तगत करण्यात आला. त्यानंतर नालासोपारा येथे राहणारा नरुल उदा शेख (६०) हा सलीमचा साथीदार असून तो देखील होलसेलमध्ये एमडीचा सप्लाय करतो असे समजताच पोलिसांनी त्यालाही बेडय़ा ठोकल्या. दोघांकडून एकूण दीड कोटींचा एमडी पोलिसांनी जप्त केला.
साधे राहणीमान, एकदाही अटक नाही
गेल्या अनेक वर्षांपासून सलीम आणि नरहू दक्षिण मुंबईत एमडीचा सप्लाय करत असून ते एकदाही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. स्वतःच्या घरात एमडीचा साठा आणून ठेवतात. मग पेडलरर्सकडून जशी मागणी येईल तसा सप्लाय करीत होते. दोघांचे राहणीमान अत्यंत साधे असून कोणालाही कळणार नाही अशा पद्धतीने ते काम करतात. नरहू हा मूळचा यूपीचा असून तो सध्या नालासोपारा येथे राहतो आणि डोंगरीत राहणाऱया सलीमसोबत एमडीचा पुरवठा करण्याचे काम करतो. युनीट-९ने या दोघांच्या मुसक्या आवळल्याने ड्रग्ज पेडलरर्सचे धाबे दणाणले आहे.
महिला पेडलरर्सना पुरवठा
सलीम आणि नरूल हे दोघे मुंबईतील एमडीचे सप्लायर आहेत. दक्षिण मुंबईत हे दोघेच एमडीचा पुरवठा करतात. यासाठी ते महिलांना हाताशी घेतात. दक्षिण मुंबईतील महिला ड्रग्ज पेडलरर्स यांच्या संपर्कात असून सलीम आणि नरहू यांनी एमडीचा साठा आणून दिल्यानंतर त्या महिला पेडलरर्स ग्राहकांपर्यंत एमडी पुरवायचे काम करतात, असे तपासात समोर आल्याचे उपायुक्त निसार तांबोळी यांनी सांगितले.
करीम लालाच्या नातेवाईकाचाही समावेश
८०च्या दशकातला नामचीन स्मगलर करीम लाला याच्या नातेवाईकाचे नावदेखील सलीम आणि नरूहच्या चौकशीत समोर आले आहे. डोंगरीत राहणाऱया करीम लालाच्या नातेवाईकाला हे दोघे एमडीचा पुरवठा करायचे. मग पुढे तो डोंगरी, जे.जे. मार्ग परिसरात एमडीची विक्री करतो. पोलीस त्याच्या मागावर आहेत.



























































