महागाईच्या फटक्याने औषधे 40 टक्क्यांनी महागली, हार्ट, डायबिटीस, ताप, खोकल्याच्या औषधांची दरवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

इंधन दरवाढीमुळे वाढलेल्या महागाईचा फटका औषधांनाही बसला आहे. हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब आदी आजारांच्या औषधांच्या किमती 15 ते 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. टॉनिक, ऑण्टिबायोटिक्स औषधांबरोबरच खोकल्याची औषधेही महागली आहेत. या दरवाढीमुळे अत्यावश्यक औषधे सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर बाहेर जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

औषधनिर्मितीसाठी आवश्यक असलेला कच्चा माल आणि रसायने आयात करावी लागतात. काहींची निर्मिती देशातच होते. आवश्यक कच्चा माल उपलब्ध झाल्याशिवाय औषधे बनवता येत नाहीत. कोरोना संकटामुळे कच्चा माल आणि रसायनांचा पुरवठा यावर परिणाम झाला. त्यांच्या किमतीही दरम्यानच्या काळात 50 टक्क्यांनी वाढल्या. त्यामुळे औषधांच्या किमतीही वाढल्या. त्यातच कोरोनामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी आवश्यकता नसतानाही मोठय़ा प्रमाणात औषधे विकत घेऊन त्यांचा साठा करून ठेवल्याने औषधांचा तुटवडाही निर्माण झाला. हा तुटवडाही औषधांच्या महागाईला कारणीभूत ठरला आहे. तापावरील पॅरासिटामोलसह संसर्ग प्रतिबंधक औषधे आणि ऑण्टिबायोटिक्सच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. खोकल्याचे सिरप गेल्या सहा महिन्यांत 4- ते 50 रुपयांनी महागले आहे. औषधांच्या किमती गेल्या दोन दशकांत इतक्या मोठय़ा प्रमाणावर वाढल्या नव्हत्या, असे औषध विक्रेते सांगतात.

हे महागले…

रक्तदाब 10 गोळ्यांचे पाकीट 172 रुपये 190 रुपये
मधुमेह 10 गोळ्यांचे पाकीट 30 पैसे 18.50 रुपये
ऑसिडिटी 15 गोळ्यांचे पाकीट 24 रुपये 37 रुपये
झंडू बाम एक डबी 35 रुपये 40 रुपये
विक्स एक डबी 50 रुपये 59 रुपये
डेटॉल एक बाटली 105 रुपये 116 रुपये
पॅल्शियम एक पाकीट 99 रुपये 110 रुपये