ऐतिहासिक ठेव्याला संजीवनी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. सचिन जोशी

दोन वर्षांपूर्वी ठाणे येथील मीठबंदर परिसरात 12 तोफा मातीत गाडलेल्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आल्या. या ऐतिहासिक ठेव्याला संजीवनी देण्याचे कार्य इतिहास अभ्यासक आणि गड किल्ले संवर्धन समितीने हाती घेतले आहे.

हिंदुस्थानात अंदाजे 15व्या शतकात मोठय़ा प्रमाणावर तोफांचा वापर युद्धात केला जाऊ लागला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात तोफा आणि बंदुकांचा वापर सर्रासपणे केला जाऊ लागला. या तोफा-बंदुका मराठय़ांच्या राज्यात तयार केल्या जात. तसेच पोर्तुगीज किंवा इंग्रजांकडून विकतदेखील घेतल्या जात असत. ठाणे येथे खाडीजवळ आज कैद्यांचे जे कारागृह आहे तेथे 16व्या शतकात पोर्तुगीजांनी एक मोठा किल्ला बांधलेला होता. आजचा कळवा ते घोडबंदर रस्ता हा या किल्ल्याजवळूनच जातो. पोर्तुगीज-मराठा संघर्षात हा किल्ला पेशवे काळात मराठय़ांनी जिंकून घेतला. पुढे काही वर्षांनी म्हणजे इ.स. 1774 साली किल्ला इंग्रजांनी मराठय़ांकडून जिंकून घेतला. इ.स. 1833 साली किल्ला इंग्रजांनी पाडून टाकला. हा किल्ला पाडला तेव्हा किल्ल्यावर अंदाजे 100 तोफा होत्या. त्यातील काही तोफा ठाणे किल्ल्याजवळ असलेल्या मीठबंदर या बंदरावर हलवल्या गेल्या. बंदरावर या तोफा मातीत उलटय़ा करून गाडल्या गेल्या. या तोफांचा वापर बंदरावर येणाऱया बोटींचे दोरखंड बांधण्यासाठी केला जात असे. या बंदरातून मिठाचा व्यापार होत असल्याने याला मीठबंदर असे नाव पडले.

दोन वर्षांपूर्वी ठाणे येथील आमच्या सहकाऱयांनी मीठबंदर परिसरात 12 तोफा मातीत गाडलेल्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. याविषयीचे फोटो त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवले. गड किल्ले संवर्धन समिती महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत या तोफांच्या जतन व संवर्धनाचे काम हाती घेण्याचे ठरले. हे काम पूर्ण करण्यासाठी आणि या तोफांचे योग्य प्रकारे जतन करण्यासाठी चेंदणी कोळीवाडा येथील स्थानिक रहिवाशांच्या मदतीची गरज होती. जानेवारी 2019मध्ये दुर्गवीर प्रतिष्ठान, दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्ट, कोंकण इतिहास परिषद व गडकिल्ले संवर्धन समितीतील सदस्यांनी कोळीवाडय़ातील ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली. पुरातत्व विभागाकडून या तोफा काढण्यासाठी परवानगी घेण्याची आवश्यकता होती. तसेच तोफा ज्या जागेवर होत्या ती जागा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची होती. त्यांचीदेखील परवानगी घेणे गरजेचे होते. या सगळ्या परवानग्या घेण्याच्या प्रक्रियेत पाच महिन्यांचा काळ गेला. मे 2019च्या पहिल्या आठवडय़ात सर्व परवानग्या मिळाल्या होत्या. परंतु तोफा ठेवण्यासाठी साधारणतः 3 फूट उंचीचा सिमेंट कॉक्रीटचा ओटा बांधून घेणे गरजेचे होते कारण तोफा काढून त्या सुरक्षितपणे कोठेतरी ठेवल्याशिवाय त्याचे योग्य जतन झाले नसते. हा ओटा बांधण्याचा खर्च अंदाजे दोन लक्ष रुपये होता. एवढा निधी उभा करणे कमी कालावधीत शक्य नव्हते. त्याच वेळी अशी माहिती समजली की तोफा जेथे आहेत त्या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत मोठय़ा प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. तेथे बाग-बगीचा, जिम, थेटर अशा काही गोष्टी तेथे होणार आहेत. याच परिसरात तोफा सुशोभित करून ठेवल्या तर त्याचे योग्य जतन होईल, असा विचार आला. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेशी पत्र व्यवहार सुरू केला. खूप पाठपुरावा करून अखेर मे 2019च्या शेवटच्या आठवडय़ात ओटय़ाचे काम पूर्ण करून घेतले. आता खऱया अर्थाने प्रत्यक्ष तोफा काढण्याचे काम सुरू करण्याचे ठरवले. तोफा काढण्याच्या कामासाठी चिपळूण येथून राजे प्रतिष्ठान या संस्थेचे कार्यकर्ते आलेले होते. दुर्गवीर प्रतिष्ठान, दुर्गसखा चॅरीटेबल ट्रस्ट, चेंदणी कोळीवाडा जमात ट्रस्ट, कोंकण इतिहास परिषद, गड संवर्धन समिती महाराष्ट्र राज्य आणि राजे सामाजिक प्रतिष्ठान असे सर्व मिळून अंदाजे 70 कार्यकर्ते तोफा काढण्यासाठी जमा झाले होते. प्रथम या तोफा काढताना पुरातत्वीय पद्धत वापरण्याचे ठरले होते. त्यानुसार तोफेच्या बाजूने चौकोन आखून कुदळ व फावडे याच्या सहाय्याने माती काढण्याचे काम सुरू केले. खोदकाम करत 6 फूट खोल गेल्यावर तोफेच्या तोंडाचा भाग दृष्टीस पडला. मात्र या तोफांवर कोणतेही पुरातत्वीय अवशेष मिळाले नाहीत.

तोफांच्या समोर चौकोनी आकाराचा खोल खड्डा तयार करून ती तोफ हळूहळू त्या खड्डय़ात आडवी केली. अशा प्रकारे सर्व तोफा मोकळ्या केल्या. मोकळ्या केलेल्या तोफा क्रेनच्या साहय्याने बाहेर काढून प्राथमिक स्वच्छता केली गेली. या तोफा ओावर ठेवण्यासाठी बाभळीच्या लाकडाचे ठोकळे तयार करून घेतले. त्यावर पावसाचा परिणाम होऊ नये म्हणून विशिष्ट लेप लावला. बारा तोफांपैकी एकूण सहा तोफा या मोहिमेत काढल्या गेल्या.

पावसाळा संपल्यानंतर दि. 8, 9 फेब्रुवारी 2020 रोजी उरलेल्या सहा तोफा काढण्याचे काम करण्याचा निर्णय घेतला. या वर्षी खर्चासाठी पैसे उपलब्ध नसल्याने सर्व कार्यकर्त्यांनी पदरचे पैसे घालून हे काम पूर्ण करण्याचे ठरवले. उरलेल्या सहा तोफा ज्या ठिकाणी होत्या त्या जागेवर मोठय़ा प्रमाणावर बांधकामाचे दगड आणून टाकलेले होते. हे दगड बाजूला काढल्याशिवाय तोफा काढणे शक्य नव्हते. तसेच तोफा उचलून बाहेर काढण्यासाठी क्रेन तेथे पोचणे अवघड होते. कार्यकर्त्यांच्या मदतीने क्रेन जाण्यासाठी मातीचा रस्ता तयारकरून तोफा काढण्याचे काम सुरू केले. सर्वात शेवटची तोफ मंदिराच्या बाहेर भिंतीला अगदीच चिटकून होती. या तोफेचा फक्त अर्ध्या फुटाचा भाग दिसत होता. भिंतीला धक्का न लावू देता ही तोफ बाहेर काढणे हे खूप अवघड होते. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही तोफ बाहेर काढली. साफसफाई झाल्यावर तोफांची मोजमापे घेतली गेली. तोफेवर कोठे काही चिन्ह किंवा लेख आहे का याची पाहणी केली. पाच तोफांपैकी दोन तोफांवर मुकुटाचे चिन्ह होते. सहावी तोफ जवळच असलेल्या मारुती मंदिराच्या सभा मंडपामध्ये असल्याने ती काढता आली नाही. धार्मिक भावना लक्षात घेता त्या तोफेला हात न लावण्याचा निर्णय घेतला.

या तोफांचे जतन व संवर्धन करताना त्या तोफा बाहेर काढून ठेवणे असा उद्देश नव्हता. मे 2019मध्ये काढलेल्या तोफांची मोजमापे घेऊन त्याची शास्त्राrय पद्धतीने रेखाटने तयार केली. तोफा मातीतून बाहेर काढल्यानंतर लगेच रसायने किंवा मशीनच्या सहाय्याने साफसफाई करणे योग्य नसते. कारण त्या तोफा किमान 200 वर्षे तरी मातीत गाडलेल्या स्थितीत होत्या. अशा वेळी त्या बाहेर काढल्यावर लगेच रासायनिक प्रक्रिया करून साफसफाई करणे जतन संवर्धनाच्या नियमांमध्ये बसत नाही. मे 2019मध्ये काढलेल्या तोफा दि. 8, 9 फेब्रुवारी 2020 रोजी रासायनिक प्रक्रिया करून स्वच्छ केल्या. त्याला रासायनिक प्रक्रिया करण्यापूर्वी तोफेवरील माती पूर्णपणे काढून घेतली. त्यानंतर लाकडी हातोडा आणि लाकडी कांबी यांचा वापर करून तोफेच्या वरच्या भागातील गंजलेले तुकडे काढून घेतले. संवर्धनाच्या भाषेत याला चीपिंग असे म्हणतात. नंतर तोफ स्वच्छ धुवून घेतली. तोफा स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणाऱया रसायनांचा वापर करून तोफ तारेच्या घासणीने घासून घेतली. रसायनामुळे व घासल्यामुळे गंज निघण्यास सुरुवात झाली. सरतेशेवटी तोफांवर सुरक्षित लेपन करून बाहेरचे दमट वातावरण व तोफ यात एक थर तयार केला.

जवळजवळ 200 वर्षे मातीखाली गाडल्या गेलेल्या तोफांचे सामाजिक संस्थांच्या मदतीने जतन व संवर्धन करून या तोफांना त्यांच्या मूळ रुपात आणण्याचा प्रयत्न केला. हे काम करत असताना सरकारी नियमांचे तसेच जतन-संवर्धनाच्या नियमांचे पालन करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मोहिमेसाठी पुणे, मुंबई, ठाणे, विरार, चिपळूण अशा खूप लांबच्या गावांमधून दुर्गप्रेमी आले होते. महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांचे पूर्ण सहकार्य मिळाले. ही मोहीम दुर्गवीर प्रतिष्ठान, चेंदणी कोळीवाडा जमात ट्रस्ट, दुर्गसखा चॅरीटेबल ट्रस्ट, राजे प्रतिष्ठान, कोंकण इतिहास परिषद, गडकिल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र राज्य आणि अनेक दुर्गप्रेमी यांच्या संय्यम आणि अथक परिश्रमाशिवाय पूर्ण होणे शक्य नव्हते.

(लेखक पुरातत्व अभ्यासक व पुरातत्व वास्तु संवर्धन तज्ञ आहेत)

[email protected]