
रत्नागिरी-सिंधुदूर्ग-रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी असणाऱ्या जाचक अटींमध्ये सुधारणा करण्याबरोबरच कोरोनानंतर पर्यटन विकासाला गती देण्यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित करण्यात आली होती.
सोमवारी आयोजित केलेल्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, कृषीमंत्री दादा भुसे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, मत्स्य व्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सुनिल तटकरे, विनायक राऊत, आमदार अनिकेत तटकरे, वैभव नाईक उपस्थित होते.
कृषीमंत्री दादा भुसे म्हणाले, कोकणातील शेतकऱ्यांच्या पीकविम्यासंदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी शासनस्तरावर विचारविनियम सुरु आहे. राज्यातील पीकविम्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे, असेही ते म्हणाले.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, कोकणातील शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कर्ज देण्यासंदर्भात दोन दिवसांत आढावा बैठक घेऊन मर्यादेपेक्षा कमी असलेल्या शेतकऱ्यांना खावटी कर्जासंदर्भातही धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिह्याच्या समस्यांसंदर्भात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी सादरीकरण केले.
यावेळी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम या योजनेअंतर्गत जोखिमस्तर 70 टक्के आहे, त्यामध्ये वाढ 80 ते 90 टक्के करावा अशी सूचनाही करण्यात आली.
कोविड-19 मुळे पर्यटन विकासाला खीळ बसली आहे. कोकणातला मुख्य व्यवसायापैकी एक असलेल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. अर्थव्यवस्थेचे चक्र हळूहळू पूर्वपदावर येत आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार पर्यटन विकास आराखडय़ाला चालना देण्यात येईल.
– आदित्य ठाकरे, पर्यटन मंत्री




























































