गिरणी कामगारांचे भारतमाता येथे उद्या धरणे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एनटीसी आणि खासगी गिरण्यांच्या धोकादायक चाळींच्या पुनर्बांधणीचे काम त्वरित हाती घ्यावे. म्हाडाच्या माध्यमातून गिरणी कामगार आणि वारसांची घरांसाठी पात्रता निश्चिती करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पण घरे कधी मिळणार? याचा जाब सरकारला विचारण्यासाठी गिरणी कामगार कृती संघटनेच्या नेतृत्वाखाली बुधवार, 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लालबाग, भारतमाता येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शेकडो गिरणी कामगार आणि वारसदार यावेळी सहभागी होणार आहेत.

कामगारांच्या प्रश्नांवर झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी धरणे आंदोलन होणार आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, खजिनदार निवृत्ती देसाई, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, रयतराज कामगार संघटनेच्या प्रमुख जयश्री खाडिलकर-पांडे, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियनचे सरचिटणीस जयप्रकाश भिलारे, चिटणीस बबन गावडे, सेंच्युरी मिल कामगार एकता मंचचे अध्यक्ष नंदू पारकर, सरचिटणीस जितेंद्र राणे, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर व सेव्रेटरी शिवाजी काळे आदी कामगार नेते उपस्थित राहून धरणे आंदोलनात मार्गदर्शन करणार आहेत.