
मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी केल्यानंतरही अभिनेत्री कंगना राणावतला केंद्र सरकारने ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा पुरविली आहे. मात्र याचा खर्च कोण करणार? याबाबत नो आयडिया असे म्हणत केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी हात झटकले आहेत.
महाराष्ट्राबाबत सोशल मीडियावर वादग्रस्त मत व्यक्त केल्यावरही कंगना राणावतला सुरक्षा पुरवल्याबद्दल अनेकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. याबद्दल गृहराज्यमंत्री रेड्डी यांनी सांगितले, कंगनाला धमक्या येत आहेत. त्यामुळे तिला सुरक्षा पुरवण्यात यावी अशा आशयाचे निवेदन तिच्या वडिलांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना दिले. त्यानंतर हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला या परिस्थितीची कल्पना दिली होती. त्यानुसार कंगनाला ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे, मात्र या सुरक्षेसाठी खर्च करण्यात येणारा पैसा कोण देणार याबाबत त्यांनी काहीच उत्तर दिले नाही.
























































